
रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला. या प्राणघातक हल्ल्यात अभिनेता सुखरूप बचावला, पण गाडीच्या चालकाला आणि चाहत्याला गोळी लागली. तीन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून येऊन हा हल्ला घडवला. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिस आणि कोटा पोलिस यांच्या एकत्रित तपासात तीन संशयितांना सोमवारी सकाळी राजस्थानातील कोटा येथून ताब्यात घेण्यात आले. फूल सिंह (वय १७), ऋतिक कुमार उर्फ रोशन (वय २२) आणि रेहान (वय १८) अशी या आरोपींची नावे आहेत. या कारवाई संदर्भात अधिक माहिती कोटाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी अधिक माहिती दिली आहे.
सोमवारी (१९ ऑक्टोबर) सकाळी कोटा रेल्वे स्थानकावर पुणे जयपूर एक्सप्रेसची तपासणी केल्यानंतर अभिनेता टायगर श्रॉफला लक्ष्य करून गोळीबार केलेल्या तीन संशयितांना कोटा पोलिसांनी ताब्यात घेतले. कोटाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ट्रेनच्या जनरल डब्यातून प्रवास करत होते. दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याचा त्यांचा कट होता. संशयित रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून मिळाल्यानंतर कोटा पोलिसांनी ही कारवाई सुरु केली.
Mumbai Crime News: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर मुंबईत झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील तीन संशयितांना राजस्थानमधील ...
तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर १५ मिनिटांच्या आत दलाचे तांत्रिक पथक सज्ज झाले होते, त्यामुळे सकाळी सुमारे साडेदहा वाजता रेल्वे स्थानकावर पोहोचताच अधिकाऱ्यांना ट्रेनची तपासणी करणे शक्य झाले. पोलीस पथकाने १५ मिनिटांत संपूर्ण ट्रेनची झडती घेतली आणि तीन संशयितांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी दोघे हरियाणाचे रहिवासी असून तिसरा आरोपी बिहारचा असल्याचे समजते.
संशयितांना कसे पकडले याचे वर्णन करताना तेजस्विनी गौतम म्हणाल्या की, मुंबई पोलीस आणि कोटा पोलीस यांच्यातील समन्वयामुळे पथकाला विनाविलंब कारवाई करण्यास मदत झाली. पुणे जयपूर एक्सप्रेस सकाळी अंदाजे साडेदहा वाजता कोटा रेल्वे स्थानकावर पोहोचली. त्यानंतर पोलीस पथकाने ट्रेनच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या संशयितांना ओळखण्यावर लक्ष केंद्रित करून ट्रेनची झडती घेतली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संशयितांनी तपास टाळण्यासाठी नेपाळला जाण्यापूर्वी दिल्लीला जाण्याची योजना आखली होती. जेव्हा संशयितांना ताब्यात घेतले त्यावेळी कोणतेही शस्त्र सापडले नाही. हल्लेखोर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या घरी यापूर्वी हल्लेखोरांनी रेकी केली होती का आणि हल्ला करण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले होते का यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.





