Monday, October 19, 2026

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान, 182 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

MLC Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेची अटीतटीची आणि बहुचर्चित औरंगाबाद, पुणे आणि नागपूर विभागातील तीन पदवीधर सोबतच अमरावती आणि पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मुंबई: सध्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदानाची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुकीमुळे संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. ही, महाराष्ट्र विधान परिषदेची अटीतटीची आणि बहुचर्चित औरंगाबाद, पुणे आणि नागपूर विभागातील तीन पदवीधर सोबतच अमरावती आणि पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी, 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठीची मतदान प्रक्रिया सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. पाच मतदार संघामध्ये होणाऱ्या ह्या निवडणूकीमध्ये एकूण 182 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीसाठी पाचही मतदारसंघांत 2 हजार 419 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, 10 लाख 68 हजार 72 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठीची निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे (शिक्षक आणि पदवीधर), नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद या पाचही मतदारसंघांतील विद्यमान सदस्यांची मुदत 6 डिसेंबर 2026 रोजी संपुष्टात येत असल्यामुळेभारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ही निवडणूक घेण्यात येत आहे. 23 ऑक्टोबरला निवडणूक झाल्यानंतर मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

पाच जागांसाठी 182 उमेदवार रिंगणात

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून 41, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून 47 आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून 38 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून 26 आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून 30 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार असून, या पाचही मतदारसंघांत मिळून 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदार ठरविणार आहेत.

2 हजार 419 मतदान केंद्रांवर व्यवस्था

पाचही मतदारसंघांमध्ये एकूण 10 लाख 68 हजार 72 मतदारांची नोंद आहे. यामध्ये पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक 3 लाख 88 हजार 19 मतदार, तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वात कमी 35 हजार 810 मतदार आहेत. मतदानासाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात 842, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात ७४१, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात 445, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात 81 आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात 310 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सर्व मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

6 डिसेंबरला विद्यमान सदस्यांची मुदत संपणार

विधान परिषदेच्या ज्या पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे, त्या जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी पूर्ण होत आहे. यामध्ये औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे सतीश भानुदासराव चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण गणपती लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत गोविंदराव वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण रामराव सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत दिनकर आसगावकर यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >