Monday, October 19, 2026

दिल्ली मेट्रो स्थानकात खळबळ : १५५ ग्रॅम सोन्याची पावडर लपवून पळणाऱ्या प्रवाशाला CISFने घेतले ताब्यात

सामानाची तपासणी सुरू असताना एक्स-रे मशीनवर एक संशयित वस्तू आढळल्याने एका प्रवाशाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी विलक्षण चपळाई दाखवत या तरुणाला अवघ्या काही क्षणांत जेरबंद केले.

नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मशिद मेट्रो स्थानकावर (Delhi Metro Station) १७ ऑक्टोबर रोजी एक थरारक घटना घडली. सामानाची तपासणी सुरू असताना एक्स-रे मशीनवर एक संशयित वस्तू आढळल्याने एका प्रवाशाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी विलक्षण चपळाई दाखवत या तरुणाला अवघ्या काही क्षणांत जेरबंद केले.

मिळालेल्या माहितीनुसार, या संशयिताच्या सामानाची कसून झडती घेतली असता पोलिसांना त्याच्या पाठीवरील पिशवीतील अंतर्वस्त्रात लपवून ठेवलेली सुमारे १५५ ग्रॅम सोन्याची पावडर सापडली.

पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद शोएब या तरुणाला अटक केली आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरचा राहणारा असून मलेशियातील कुआलालंपूर येथेही त्याचे वास्तव्य असल्याचे तपासात उघड झाले आहे. सुरक्षेची काळजी घेत CISF जवानांनी त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी तातडीने दिल्ली पोलिसांच्या सुपूर्द केले. या घटनेची माहिती देताना CISF ने सोशल मीडियावर सांगितले की, स्कॅनिंग वेळी संशयित वस्तू दिसताच प्रवाशाने घाबरून पळून जाण्याचा बेत आखला होता. मात्र, जवानांच्या प्रसंगावधानामुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानाने धावत जाऊन त्याला एक्झिट गेटजवळ गाठले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये एक जवान अत्यंत वेगाने पायऱ्या चढून जात त्या प्रवाशाला पकडताना स्पष्ट दिसत आहे.

या कारवाईनंतर दिल्ली पोलिसांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) मासूम रझा यांनी घटनास्थळी धाव घेत शोएबला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या बॅगेची तपासणी केल्यावर अंतर्वस्त्रात दडवलेली १५५ ग्रॅम सोन्याची पावडर जप्त केली. चौकशीदरम्यान शोएबने आपण मलेशियात टेक्सटाईल क्षेत्रात काम करत असल्याचे सांगितले. तो १६ ऑक्टोबरलाच दिल्लीत पोहोचला होता आणि जामा मशिद परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होता. लाजपत नगरच्या दिशेने प्रवास करण्यासाठी तो मेट्रो स्थानकात आला असताना ही कारवाई झाली. सुरुवातीला जप्त केलेली पावडर पाहून ती ड्रग्स किंवा एखादा अंमली पदार्थ असावा असा पोलिसांचा संशय बळावला होता. यामुळे नार्कोटिक्स विभागाला बोलावून तपासणी करण्यात आली, मात्र ती सोन्याची पावडर असल्याचे सिद्ध झाले.

या सोन्याबाबत शोएब कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा मालकी हक्क दाखवू शकला नाही. तसेच पोलिसांच्या प्रश्नांची कोणतीही समाधानकारक उत्तरे त्याच्याकडे नव्हती. याप्रकरणी सुप्रीम कोर्ट मेट्रो पोलीस ठाण्यात दिल्ली पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >