INDW vs ZIMW: भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेला दिला क्लिन स्विप, तिसऱ्या टी20 सामन्यात 92 धावांनी नमवलं
भारत आणि झिम्बाब्वे महिला संघात तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेत भारताने तिन्ही सामन्यात विजय मिळवला आणि झिम्बाब्वेला क्लिन स्विप दिला.
October 20, 2026 10:25 PM
INDW vs ZIMW: भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेला दिला क्लिन स्विप, तिसऱ्या टी20 सामन्यात 92 धावांनी नमवलं (Photo: BCCI Women Twitter)
स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेला 3-0 ने पराभूत केलं. स्मृती मंधानाने नेतृत्व हाती घेतल्यानंतर पहिल्याच मालिकेत दणदणीत विजय मिळवला आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच 20 षटकात 7 गडी गमवून 216 धावा केल्या आणि विजयासाठी 217 धावांचं आव्हान दिलं. खरं तर हे आव्हान झिम्बाब्वे संघाच्या क्षमतेपलीकडचं होतं आणि भारताचा विजय तेव्हाच निश्चित झाला होता. झालंही तसंच.. भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला 92 धावांनी पराभूत केलं आणि मालिका 3-0 ने जिंकली. या फॉरमॅटमध्ये भारताने मायदेशात सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. स्थायी कर्णधार म्हणून स्मृती मंधानासाठी ही एक चांगली सुरुवात आहे.
भारताचा डाव
भारताकडून शफाली वर्मा आणि अनुष्का शर्मा यांनी सुरूवात केली. शफाली वर्माने आक्रमक खेळी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. शफाली वर्माने 37 चेंडूत 69 धावांची खेळी केली. यात तिने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. तिचा स्ट्राईक रेट हा 186.49 चा होता. अनुष्का शर्माने 20 चेंडूत 28 धावा केल्या आणि बाद झाली. तर निकी प्रसाद फार काही करू शकली नाही. तिने 12 चेंडूत 9 धावांची खेळी केली. पण हरमनप्रीत कौरचा झंझावात यावेळी पाहायला मिळाला. तिने 41 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकार मारत नाबाद 91 धावांची खेळी केली. तिच्या या खेळीमुळे भारताने 216 धावांपर्यंत मजल मारली. दुसरीकडे, ऋचा घोष 1, दिप्ति शर्मा 0, अरुंधती रेड्डी 4 आणि प्रेमा रावत 4 धावा करून बाद झाले. यावेळी स्मृती मंधाना फलंदाजीला उतरली नाही.
रायपूरच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 सामन्यात एक मोठी आणि खळबळजनक घटना घडली आहे. भारतीय महिला संघाची धडाकेबाज ...
झिम्बाब्वेचा डाव
भारताने विजयासाठी दिलेल्या 217 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला सुरूवातीला धक्का बसला. केलिस न्धलोवू शून्यावर बाद झाली. तर मॉडेस्टर मुपाचिकवा 1 धाव करून तंबूत परतली. शार्न मेयर्स आणि प्रिय बिझा यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी फुटली आणि झिम्बाब्वेचा डाव पुन्हा घसरला. खरं तर हा सामना जिंकणं कठीण होतं. पण कडवी झुंज देणंही झिम्बाब्वेला जमलं नाही. त्यामुळे भारताविरुद्धच्या पहिल्याच टी20 मालिकेत क्लिन स्विप मिळाला.