Tiger Shroff Car Attack: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं मनोरंजनविश्वात खळबळ उडाली होती. एका पार्कच्या गेटबाहेर टायगरच्या गाडीला लक्ष्य करत हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात अभिनेता सुदैवानं बचावला, मात्र त्याचा ड्रायव्हर जखमी झाला. आता या घटनेशी संबंधित काही महत्त्वाचे तपशील समोर आले असून, गोळीबाराच्या वेळी नेमकं काय घडलं, याची चर्चा सुरू झाली आहे.
टायगर श्रॉफने सांगितला थरारक घटनाक्रम
मिळालेल्या वृत्तानुसार, टायगर श्रॉफ पुष्पा पार्कमधून घरी परतत असताना त्याची गाडी गेटजवळ पोहोचली. याच वेळी दोन हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात एकूण पाच गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती टायगरने पोलिसांना दिली आहे. टायगरच्या म्हणण्यानुसार, तीन गोळ्या गाडीच्या डाव्या बाजूने, तर दोन गोळ्या समोरून झाडण्यात आल्या. गोळीबाराचा आवाज ऐकताच टायगर सतर्क झाला आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी सीटवर मागच्या बाजूला सरकला. त्यानंतर तो काही वेळ स्तब्ध राहिला. या प्रसंगात त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
ड्रायव्हरला लागली गोळी
या गोळीबारात टायगर श्रॉफला कोणतीही दुखापत झाली नसली, तरी त्याचा ड्रायव्हर फिरदौस बलुच जखमी झाला. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारातील एका गोळीमुळे ड्रायव्हरला दुखापत झाली. याशिवाय, समोरून झाडण्यात आलेल्या गोळ्यांपैकी एक गाडीच्या बोनेटवर, तर दुसरी विंडस्क्रीनवर लागली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. टायगरच्या सुरक्षिततेबाबत त्याचे चाहते आणि बॉलिवूडमधील अनेकजण चिंतेत आहे.
लखनऊ–प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावरील दखिना टोल प्लाझाजवळ तीन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे. ...
हल्ल्यापूर्वीचा व्हिडीओ चर्चेत
या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये टायगरची गाडी मैदानातून गेटच्या दिशेने येताना दिसत आहे. गेटजवळ चाहत्यांची गर्दी असताना हल्लेखोरांनी गाडीवर गोळीबार केला. दोन हल्लेखोरांपैकी एकाने गाडीच्या समोरच्या बाजूने, तर दुसऱ्याने टायगर बसलेल्या बाजूने गोळीबार केला. टायगरच्या बाजूने गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराच्या बंदुकीत तांत्रिक अडथळा आल्यामुळे तो थोडक्यात बचावला.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. गोळीबारात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण काय, याचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. टायगर श्रॉफ या हल्ल्यातून बचावला असला, तरी भरवस्तीत आणि चाहत्यांच्या गर्दीजवळ घडलेल्या या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून आणखी कोणते तपशील समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.