Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी अति महत्वाच्या व्यक्ती येणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आवश्यक पूर्वतयारीची कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत. विकासकामे, सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांशी संबंधित कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
त्र्यंबक नगरपरिषद येथे आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी प्रसाद बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्षा पल्लवी शिरसाठ, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एस., सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अपर आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार गणेश जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे मुख्याधिकारी अमोल चौधरी, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विकासकामे २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
कुशावर्त तीर्थ परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित विभागांना कामांचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या. कामांचे चार भागांत विभाजन करून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा. आवश्यक काँक्रीट व पीसीसीची कामे, फॅब्रिकेशन, वेल्डिंग, रंगकाम आणि सँडब्लास्टिंगची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. संबंधित कामे २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध करून द्यावे. पूर्ण झालेली कामे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ परिसरात सुरू असलेली विकासकामे निर्धारित वेळेत ...
रात्रीच्या वेळेतही कामे सुरू ठेवावीत
कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार रात्रीच्या वेळेतही कामे सुरू ठेवावीत. त्यासाठी हायड्रा क्रेन, वेल्डर, तंत्रज्ञ आणि आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करावी. कामाच्या स्वरूपानुसार आठ तासांच्या पाळ्यांमध्ये मनुष्यबळाचे नियोजन करावे. कुशावर्त परिसरातील पाणी काढण्याची व्यवस्था, पंपांची उपलब्धता आणि संबंधित यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करावी. कामांमध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत, यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखावा, असेही त्यांनी सांगितले.
सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी
अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक तपासणी करावी. हेलिपॅड व एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संबंधित तांत्रिक बाबींची पाहणी करून आवश्यक पूर्तता करावी. कार्यक्रमस्थळावरील प्रवेश व्यवस्था, सुरक्षित हालचाल आणि विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यानुसार कार्यवाही करावी. सुरक्षा यंत्रणा व प्रशासकीय विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.