Eknath Shinde : जरांगेंनी समाजाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर करू नये; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या 500 कोटी रुपयांच्या आरोपांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खंडन केले. “मी कोणालाही 500 कोटी रुपये दिलेले नाहीत किंवा घेतलेले नाहीत. पुरावे असतील तर सादर करा,” असे आव्हान देत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. तसेच मराठा समाजाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या 500 कोटींच्या आरोपांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी खंडन केले. “मी कोणालाही 500 कोटी रुपये दिलेले नाहीत किंवा घेतलेले नाहीत. जरांगे-पाटील यांनी आरोप करण्यापूर्वी शहानिशा करावी. त्यांच्याकडे काही पुरावे असतील, तर ते सादर करावेत. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,” असे प्रतिआव्हान शिंदे यांनी दिले. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी जरांगे यांनी काम करावे; मात्र समाजाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.


नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यासाठी शिंदे बुधवारी दिल्लीत होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी जरांगे यांच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट केली. “आमचे सर्व प्रवक्ते यावर बोलत आहेत. मी कोणालाही 500 कोटी रुपये दिलेले नाहीत किंवा घेतलेले नाहीत. जरांगे यांनी शहानिशा करून बोलावे. त्यांच्याकडे पुरावे असतील, तर ते द्यावेत. त्याची चौकशी झाली पाहिजे,” असे शिंदे म्हणाले. बीडमधील दसरा मेळाव्यात जरांगे यांनी शिंदे यांच्यावर आरोप करत, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत 500 कोटी रुपये दिल्याची चर्चा भाजपमध्ये असल्याचा दावा केला होता. या आरोपावर शिंदे यांनी दसरा मेळाव्यात उत्तर द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले होते. मात्र, मेळाव्यात शिंदे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले नव्हते. त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. यामध्ये रामदास कदम आघाडीवर होते. कदम यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत त्यांना शिंदे यांच्याविरोधात पुन्हा बोलू नये, असा इशारा दिला होता.


या टीकेनंतर जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करण्याचा इशारा दिला. “मी तुमच्याकडे एका साध्या प्रश्नाचे उत्तर मागितले होते; मात्र तुम्ही चिडत आहात, बावचळून गेला आहात. तुम्ही मला 500 कोटी रुपये दिले का, याचे हो किंवा नाही असे उत्तर द्या. मी वाट पाहत आहे. थोड्या दिवसांत कळेलच की बोलण्याआधी विचार करायला हवा होता,” असे म्हणत त्यांनी पुरावे देणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी प्रथमच आरोपांवर प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, “जरांगे मराठा समाजाचे काम करत होते, तेव्हा मी मुख्यमंत्री असताना समाजाला विविध निर्णयांतून न्याय देण्याचे काम केले. गेल्या 60 वर्षांत जे काम झाले नाही, ते आम्ही केले. कुणबी प्रमाणपत्रे देणे, आरक्षण आणि 5 हजार 300 जणांना अधिसंख्य पदांवर नोकऱ्या देण्यासारखे निर्णय घेतले. अनेक दशकांपासून मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना जे करता आले नाही, ते आम्ही करून दाखवले,” असे ते म्हणाले.


मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा अन्य कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी केले नाही अथवा कोणाचे आरक्षण काढून घेतले नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रक्रियेला सुरुवात झाली होती आणि आजही मराठा समाजाचे आरक्षण टिकून आहे, असे त्यांनी नमूद केले. “मराठा समाजाचे काम मनोज जरांगे करत होते, त्यामुळे आम्ही त्यांना मदत केली. त्यांनी समाजाच्या प्रश्नांसाठी काम करावे; मात्र या आंदोलनाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर करू नये,” अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.



मोदी शहांवर आरोप केले की हेडलाईन होते


उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेल्या विधानावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आरोप केले की माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या आणि हेडलाईन्स होतात. आता त्यांना काय कामधंदा उरला आहे का? कोणाच्या तरी गर्दीत जाऊन घुसायचे, माईक घ्यायचा आणि भाषण ठोकायचे. त्यांच्याकडे गर्दी आणि माणसेही नाहीत. त्यामुळे दुसऱ्याच्या व्यासपीठावर जाऊन तिसऱ्यांवर बेछूट आरोप करायचे, एवढेच सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली.

Comments
Add Comment

"खरी व्होटचोरी 2019 मध्ये झाली...", एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई: "महाराष्ट्रातील जनतेने २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला मतदान करून जनादेश दिला होता. मात्र, सत्तेच्या

मनोज जरांगेंच्या संपत्तीची चौकशी करा! रामदास कदमांची मागणी

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी नारायणगड येथील दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

"जळजळ, मळमळ... कोणी पुढे गेला की... " उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर बोचरी टीका

मुंबई: दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

"जिंकता तेव्हा EVM चांगली आणि हरता तेव्हा...", उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे यांची घणाघाती टीका

मुंबई: दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. SIR च्या

Priyanka Chaturvedi: नेत्या प्रियंका चतुर्वेदींचा संजय राऊतांना घरचा आहेर, नेमक्या काय म्हणाल्या?

मुंबई: अल्बानियातील हिंसक आंदोलनाच्या संदर्भात उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर माजी खासदार

हिवाळी अधिवेशनाआधी राष्ट्रवादीला अर्थखाते द्या !

मुंबई : हिवाळी अधिवेशन जवळ येत असताना राज्याच्या अर्थखात्याच्या वाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.