Wednesday, October 21, 2026

FDA Raids : सणासुदीत भेसळखोरांना दणका; खाद्यतेल, पनीर, खवा... FDA च्या धडक कारवाईत कोट्यवधींचा साठा जप्त

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक कारवाई करत सुमारे १३.११ कोटी रुपयांचा भेसळयुक्त, निकृष्ट आणि असुरक्षित अन्नसाठा जप्त केला. १६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या मोहिमेत खाद्यतेल, पनीर, खवा, मिठाई आणि कृत्रिम रंगयुक्त वेफर्सवर कारवाई करण्यात आली. मुंबईतील चार अन्न आस्थापनांचे परवानेही निलंबित करण्यात आले.

मुंबई: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यव्यापी धडक मोहीम राबवली आहे. १६ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभरात करण्यात आलेल्या या विशेष तपासणी मोहिमेत सुमारे १३.११ कोटी रुपयांचा भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचा आणि असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. यात ३२,०६१ लिटर खाद्यतेल आणि ३७,१२८ किलो इतर अन्नपदार्थांचा समावेश असून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विभागांनुसार केलेली कारवाई आणि जप्त मुद्देमाल:

  • कोकण विभाग (भिवंडी): भिवंडीतील मे. विराज एन्टरप्रायजेस येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. तपासणीत 'पोमास ऑइल' (Pomace Olive Oil) म्हणून विकले जाणारे तेल पूर्णतः शेंगदाणा तेल असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत ११,७७९ लिटर खाद्यतेल आणि २,८५० किलो चहा असा एकूण ११ कोटी २७ लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

  • छत्रपती संभाजीनगर विभाग: या विभागात खाद्यतेल, शेव-फरसाण, खवा, पेढे, कलाकंद, तूप आणि बेकरी उत्पादनांसह एकूण ३३,९४० किलो साठा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत १८७.५२ लाख रुपये आहे. यात धाराशिव, परभणी, जालना आणि बीड परिसरातील विविध आस्थापनांचा समावेश आहे.

  • पुणे विभाग: बावधन, कसबा पेठ आणि बिबवेवाडी परिसरात अयोग्य तापमानात साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी ९,००० किलो पनीर आणि ४४० किलो खवा जप्त करण्यात आला. तसेच पौड रोडवरील M/s Suryam Enterprises मधून ९,८८८ लिटर खाद्यतेल आणि मार्केट यार्डमधून इतर अन्नपदार्थ जप्त करण्यात आले.

  • नागपूर विभाग: नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात केलेल्या कारवाईत १,०७८.४० लिटर खाद्यतेल आणि ४९ किलो खवा जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १२,००,७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • नाशिक विभाग (अहिल्यानगर): श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील मे. चैतन्य किराणा हार्डवेअरमधून ८७ किलो भगर निकृष्ट दर्जाची व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आली.

प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूवर मोठी कारवाई

जालना आणि मुंबईत विनापरवाना व प्रतिबंधित पानमसाला-सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. जालना येथे महसूल व गुप्त माहितीच्या आधारे पाठलाग करून एका आयशर वाहनातून १५३.२५ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त करण्यात आला. वाहन आणि इतर उपकरणांसह एकूण १८३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मुंबईत एका टेम्पोमधून १७ लाखांहून अधिकचा प्रतिबंधित साठा जप्त करून एका आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत रंगाचे वेफर्स जप्त आणि ४ आस्थापनांचे परवाने निलंबित

  • कांदिवली कारवाई: कांदिवली पूर्व व पश्चिम परिसरात केलेल्या छाप्यात कृत्रिम रंग मिसळलेले बटाटा वेफर्स, केळी वेफर्स, शेव, जिलेबी आणि महाराजा हलवा जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.

  • परवाने निलंबन: मुंबईतील निकृष्ट व अस्वच्छ परिस्थितीमुळे बोरीवलीतील 'मे. अरबियन शेवर्मा कॅफे', माहिममधील 'मे. नाथ फास्ट फूड', 'NAIR ON FIRE Cloud Kitchen' आणि 'BIKANER SWEETS AND NAMKIN' या ४ अन्न आस्थापनांचे परवाने अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अन्नधान्य व मिठाई विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी अशी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >