
Mumbai Fire News: अंधेरी येथील साकीनाका परिसरातील खैराणी रोड येथे मंगळवारी (20 ऑक्टोबर) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य चार जण भाजल्याने जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उबाठाने यापुढे बॅनरवर जिना आणि उमर खालिदचे फोटो लावावेत मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील उबाठाच्या दसरा मेळाव्यातून शरिया समर्थकांना पाठबळ ...
मिळालेल्या माहितीनुसार, आगीने सुमारे 4,000 बाय 4,000 चौरस फुटांच्या परिसरातील 60 ते 70 व्यावसायिक गाळे आणि चाळींमधील साहित्याला आपल्या कवेत घेतले. या आगीत कपड्यांचा साठा, प्लास्टिक ग्रॅन्युल्स, भंगार साहित्य, लाकडी फर्निचर, एलपीजी सिलिंडर, मशिनरी, इलेक्ट्रिक वायरिंग आणि इतर साहित्य जळून खाक झाले.
या आगीची झळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांनाही बसली. दोन दुचाकी आणि एका टेम्पोचे नुकसान झाले आहे. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दोघांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरू
अग्निशमन दलाने मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी आग पूर्णपणे विझवली. त्यानंतर घटनास्थळावरून दोन अनोळखी व्यक्तींचे जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या घटनेत भाजलेल्या 4 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून, त्यांना अनुक्रमे 80 टक्के आणि 40 टक्के भाजले आहे. उर्वरित जखमींवरही उपचार सुरू आहेत.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास केला जाण्याची शक्यता आहे.






