Wednesday, October 21, 2026

इंटरनेटच्या सुरक्षेला मोठा धोका! eMudhra च्या 8 डिजिटल प्रमाणपत्रांमध्ये गंभीर त्रुटी

जेव्हा आपण ऑनलाईन एखादी वेबसाईट उघडतो आणि त्यावर https किंवा लॉकचे चिन्ह असेल तेव्हा ती सुरक्षित आहे असे आपण गृहीत धरतो. पण जर ती वेबसाईट सुरक्षित करण्यासाठी वापरलेले डिजिटल प्रमाणपत्रच सदोष असेल तर? असेच एक प्रकरण eMudhra बाबत घडले. या कंपनीने वेबसाईट्स आणि ऑनलाईन सेवांना जारी केलेल्या आठ डिजिटल प्रमाणपत्रांमध्ये अत्यंत कमकुवत प्रायव्हेट की असल्याचे आढळून आले. या त्रुटीचा गैरफायदा घेतल्यास हल्लेखोरांना वेबसाइट्ससाठी बनावट सुरक्षा प्रमाणपत्रे तयार करणे आणि अधिकृत सर्व्हर भासवणे शक्य झाले असते.

या कारणाने आता ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मोझिला यांनी सदोष प्रमाणपत्रे ब्लॉक करण्यासाठी पावले उचलली आहेत. तर क्लाउडफ्लेअर आणि इतर सॉफ्टवेअर प्रदात्यानी सुरक्षा उपाययोजना लागू केल्या आहेत. आतापर्यंत कोणीही या कमकुवत कीजचा गैरवापर करून हल्ला केल्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र, एवढी मूलभूत सुरक्षा त्रुटी कशी काय लक्षात आली नाही आणि संपूर्ण इंटरनेटवरील ही समस्या दूर करायला किती वेळ लागेल, याबद्दल या घटनेने गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.

eMudhra म्हणजे काय?

ईमुद्रा ही एक भारतीय डिजिटल ट्रस्ट आणि सायबर सुरक्षा कंपनी आहे. ही कंपनी डिजिटल प्रमाणपत्रे जारी करते आणि डिजिटल ओळख व प्रमाणीकरणाशी संबंधित सेवा पुरवते. ही कंपनी अशी प्रमाणपत्रे जारी करते जी एखाद्या वेबसाईटला कनेक्ट होण्यापूर्वी ती खरी आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमच्या ब्राउझरला मदत करतात. प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखाद्या वेबसाईटला भेट देतो, तेव्हा ब्राउझर योग्य सर्व्हरशी कनेक्ट होत असल्याची खात्री करतो. त्यामुळे ही डिजिटल प्रमाणपत्रे वेबसाईटची ओळखपत्रांप्रमाणे काम करतात.

eMudhra सध्या चर्चेत का आहे?

ईमुद्रा घोटाळा ३० एप्रिल, २०२५ रोजी तयार केलेल्या आठ इंटरमीडिएट सर्टिफिकेट्स भोवती केंद्रित आहे. ज्यांच्या प्रायव्हेट कीज कमकुवत असल्याचे आढळून आले. या किजमध्ये पी ३८४ इलिप्टिक कर्व्हचा वापर अपेक्षित होता, ज्यामुळे अंदाजे ३८४ बिट्सची रँडमनेस म्हणजेच सुमारे १ नंतर ११५ शून्य अशी संभाव्य मूल्ये मिळायला हवी होती. त्याऐवजी खाजगी की फक्त एक बाईट होत्या. एक बाइट फक्त ५६ संभाव्य मूल्ये दर्शवू शकत असल्याने, संशोधक एका सेकंदापेक्षा कमी वेळात सर्व आठ की पुनर्प्राप्त करू शकतात. संशोधकांनी असा इशारा दिला आहे की, जर या कीजचा गैरवापर झाला असता, तर हल्लेखोरांना वेबसाइट्ससाठी बनावट सुरक्षा प्रमाणपत्रे तयार करता आली असती आणि अधिकृत सेवांचे रूप धारण करता आले असते.

eMudhra चे म्हणणे काय?

कंपनीने ही समस्या मान्य केली आहे. एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, 'eMudhra एका सुरक्षा घटनेची तपासणी करत आहे, ज्याचा परिणाम आमच्या TLS प्रमाणपत्र ग्राहकांच्या एका भागावर झाला आहे.या घटनेचा आमच्या एंटरप्राइझ ॲप्लिकेशन्स, डिजिटल स्वाक्षरी सेवा किंवा इतर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी उपाय वापरणाऱ्या ग्राहकांवर कोणताही परिणाम झालेला नाही. आम्ही तपास सुरू ठेवत असतानाच, प्रभावित TLS ग्राहकांशी सक्रियपणे संपर्क साधून त्यांना आवश्यक ते सहकार्य पुरवत आहोत.'

 

वापरकर्त्यांनी काय करावे?

नियमित वापरकर्त्यांनी त्यांचे ब्राउझर, स्मार्टफोन आणि ऑपरेटिंग सिस्टीम अद्ययावत ठेवावेत. जुन्या उपकरणांमध्ये आणि बऱ्याच काळापासून अद्ययावत न केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये सुरक्षेच्या समस्या येत राहू शकतात. यावरून हे दिसून येते की इंटरनेट सुरक्षा केवळ लॉकपुरती मर्यादित नाही. वेबसाइटची ओळख संरक्षित करणारी डिजिटल प्रमाणपत्रे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >