नाशिक: राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेत, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रथम वर्षासाठी अतिरिक्त परीक्षेची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांच्या विशेष पुढाकाराने आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडच्या (NMC) पाठपुराव्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे. कोविड काळातील अडचणी व वैयक्तिक समस्यांमुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 2019-20 पासूनच्या सर्व बॅचेससाठी आता 4 नियमित आणि 1 'दया संधी' असे एकूण 5 प्रयत्न मिळणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे हा यामागील मुख्य उद्देश असून, संबंधित महाविद्यालयांनी या परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
शैक्षणिक नुकसान टळणार
विद्यार्थ्यांना विविध आरोग्याशी संबंधित समस्या, वैयक्तिक अडचणी तसेच अपवादात्मक परिस्थितीमुळे अभ्यासात अनेक अडथळे आल्याने परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण झाले होते. यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे (एनएमसी) वारंवार विनंती करण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त परीक्षेची संधी मिळावी यासाठी विद्यापीठाने सातत्याने प्रयत्न केले. या अनुषंगाने नुकताच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग व पदवी वैद्यकीय शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना दयेचा प्रयत्न म्हणून अतिरिक्त एक संधी वाढवून दिली आहे. पूर्वी केवळ चार संधी देण्यात येत होत्या, मात्र आता दयेची एक संधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे संभाव्य शैक्षणिक नुकसान टळणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी केलेले प्रयत्न, मानसिक ताण आणि पालकांवरील आर्थिक भार यातून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळावा, हाच यामागे विद्यापीठाचा मुख्य हेतू असल्याचे कुलगुरुंनी स्पष्ट केले.
विद्यापीठ प्रशासनाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
या संपूर्ण प्रक्रियेबाबत माहिती देताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, कुलगुरु महोदयांच्या प्रयत्नांतून घेण्यात आलेला हा विद्यार्थी हिताचा निर्णय अत्यंत मोलाचा आहे. याबाबत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे विद्यापीठाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या हिताकरिता नेहमीच सकारात्मक निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कटिबद्ध आणि प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई : नागपूर, अमरावती आणि कोकण विभागांतील संभाव्य पाणीटंचाईच्या सर्व टप्प्यांचे वस्तुनिष्ठ व गावनिहाय कृती आराखडे येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत सादर ...
पात्रता आणि अटींची पूर्तता
नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार, विद्यार्थ्याने एमबीबीएसचा अभ्यासक्रम हा इंटर्नशिपसह दहा वर्षांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच प्रथम वर्ष हे प्रवेशापासून चार प्रयत्नांमध्ये किंवा चार वर्षांच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि 2020-21 या दोन बॅचेसना कोविडच्या प्रादुर्भावामुळे विशेष बाब म्हणून पाचवा प्रयत्न देण्यात आला होता. आता नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शैक्षणिक वर्ष 2019-20 बॅचपासून पुढील सर्व बॅचेसमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक विशेष दयेची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता एकूण पाच प्रयत्न करता येणार असून, यात चार नियमित आणि एक दयेची संधी असणार आहे.
एकदाच लागू असणारी विशेष उपाययोजना
ज्या वैद्यकीय विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षाचे चार वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यांनाही ही दयेची संधी घेता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्याचा प्रवेश वैध असणे आवश्यक असून तो महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने रद्द केलेला नसावा, अशी अट ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्याने वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम इंटर्नशिपसह दहा वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे बंधन कायम राहणार आहे. ही एक वेळची विशेष उपाययोजना असल्याने तिचा पूर्वापार दाखला म्हणून वापर करता येणार नाही आणि ती पुढील येणाऱ्या बॅचेसना लागू राहणार नाही. याबाबत नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या अधिकृत संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, संबंधित विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये आणि संबंधितांनी या निर्णयाची तातडीने दखल घेऊन तशी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.