Nashik Crime : येवला तालुक्यात प्रस्तावित पेट्रोल पंपाच्या मंजुरीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट कागदपत्र तयार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी, कार्यालयाचा खोटा गोल शिक्का आणि बोगस जावक क्रमांकाचा वापर करून महसूल विभागासह हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची (HPCL) दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेट्रोल पंपासाठी बनावट दाखला तयार
मिळालेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील एस. एन. डी. इंजिनिअरिंग कॉलेज ते राज्य महामार्ग क्रमांक २५ वरील पाटोदा बस थांब्यादरम्यान पेट्रोल पंपासाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याचा उल्लेख असलेले एक पत्र तयार करण्यात आले होते. हे पत्र २२ जुलै २०२६ रोजी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रादेशिक कार्यालयाला पाठवण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते.मात्र, या पत्रावर तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याऐवजी आयुष प्रसाद यांचे नाव नमूद करण्यात आले होते. त्यासोबतच स्वाक्षरी आणि अधिकृत शिक्क्याचाही बनावट वापर करण्यात आल्याचे तपासणीत समोर आले.
सातारा : कराड शहराजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री भीषण अपघात घडला. स्कॉर्पिओ कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या ...
जावक नोंदवहीत क्रमांकच सापडेना
सप्टेंबर महिन्यात एक व्यक्ती नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आली होती. तिने स्वतःकडील पत्राची प्रत दाखवून त्याच धर्तीवरील अधिकृत दाखला देण्याची मागणी केली. यानंतर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी संबंधित पत्राची तपासणी केली असता त्यावर नमूद केलेला जावक क्रमांक कार्यालयाच्या नोंदवहीत आढळला नाही. पुढील पडताळणीमध्ये एचपीसीएलला अशा स्वरूपाचे कोणतेही अधिकृत पत्र पाठवण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाचा वापर करून बनावट दस्तऐवज तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एचपीसीएलला सतर्कतेचे पत्र
हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित दाखला पूर्णपणे बोगस आणि बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा दाखला शासकीय कामकाजासाठी किंवा पेट्रोल पंपाच्या मंजुरीसाठी ग्राह्य धरू नये, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एचपीसीएल प्रशासनाला पाठवण्यात आले आहे. त्यामुळे या बनावट कागदपत्राच्या आधारे कोणतीही अधिकृत कार्यवाही होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
सरकारवाडा पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी महसूल सहायक विक्रम बदादे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दस्तऐवज तयार करणे, फसवणूक करणे, मौल्यवान कागदपत्रांचे बनावटीकरण करणे आणि बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे यासंबंधीच्या आरोपांचा गुन्ह्यात समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत कागदपत्रांचा गैरवापर करून पेट्रोल पंपाच्या मंजुरीसाठी प्रयत्न झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या बनावट कागदपत्रामागे नेमके कोण आहे आणि त्याचा वापर करून पुढे कोणती कार्यवाही करण्याचा प्रयत्न होता, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.