
Nashik : ओझर-पिंपळगाव महामार्गावरील पुलावर आज दुपारी शिरपूर-नाशिक एसटी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबांना धडक दिली आणि त्यानंतर थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
चालकाचे नियंत्रण सुटले अन्...
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरपूरहून नाशिकच्या दिशेने जाणारी एसटी बस ओझर-पिंपळगाव महामार्गावरील पुलावरून जात असताना चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबांना धडक दिली आणि थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
Nashik : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नाशिककरांनी गृहखरेदीचा मुहूर्त साधत रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा बूस्ट दिला. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या ...
जखमींना रुग्णालयात हलवले
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून, जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींची नेमकी संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. अपघाताची माहिती मिळताच आमदार दिलीप बनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच मदतकार्य जलदगतीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.
महामार्गावर वाहतूक कोंडी
या अपघातामुळे ओझर-पिंपळगाव महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




