नुकतेच अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांनी त्यांच्या आगामी 'उडता तीर' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दसऱ्याच्या निमित्ताने आशीर्वाद घेण्यासाठी अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट दिली. यादरम्यान सारा अली खान ही एका व्हिडिओ मध्ये रडताना दिसत आहे. सारा अली खान आणि आयुष्मान दरबार साहिब येथे प्रार्थना करत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये दरबार साहिब येथे एक पवित्र वस्त्र हातात धरून सारा भावुक झालेली आणि रडताना दिसत आहे, तर तिच्या बाजूला आयुष्मान हात जोडून प्रार्थना करत उभा आहे. साराच सुवर्ण मंदिरातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
मंगळवारी, साराने इंस्टाग्रामवर आयुषमानसोबतच्या भेटीतील एक फोटो शेअर केला. हे दोघे सुवर्णमंदिरासमोर सारख्याच पांढऱ्या पारंपरिक कपड्यांत दिसले. दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या फॉलोअर्सना शुभेच्छा देताना साराने फोटोला कॅप्शन दिले, 'Happy Dussehra Wishing everyone love, luck and laughter'. तर साराच्या भावुक होण्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, 'गुरुद्वारात गेल्यावर असा अनुभव येतोच. देवासमोर प्रत्येक जण भावुक होतो.'
prahaar.in/2026/10/20/deepika-ranveer-announce-second-daughter-name-devi-padukone-singh/
आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांचा 'उडता तीर' हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सुरूवातीला ९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु चित्रपटाला प्रदर्शनासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून तो पुढे ढकलण्यात आला. या चित्रपटात आयुष्मान एका पाकिस्तानी गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे, जो आपली स्मरणशक्ती गमावतो आणि यातून विनोद व देशभक्ती यांचा संगम साधणाऱ्या एका विनोदी चित्रपटाची पार्श्वभूमी तयार होते. चित्रपटाची निर्मिती करण जोहर, आदर पूनावाला, अपूर्व मेहता, गुनीत मोंगा कपूर आणि अचिन जैन यांनी केली आहे.