Wednesday, October 21, 2026

Satara : कराडजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण दुर्घटना, चार मित्रांचा करुण अंत

सातारा : कराड शहराजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री भीषण अपघात घडला. स्कॉर्पिओ कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत सातारा जिल्ह्यातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन तरुण जखमी झाले. या दुर्घटनेमुळे खटाव तालुक्यातील कातरखटाव गावावर शोककळा पसरली आहे.

महालक्ष्मीच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कातरखटाव गावातील सात मित्र दसऱ्यानिमित्त कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असताना मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कराडजवळील पुणे-बेंगळुरू महामार्गावरील उड्डाणपुलावर त्यांच्या स्कॉर्पिओ कारचा ट्रकशी अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, स्कॉर्पिओ कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे :

- तेजस देशमुख (वय २५ वर्षे)

- सागर निंबाळकर (वय २३ वर्षे)

- सुयश चिंचकर (वय २० वर्षे)

- रोहित धोत्रे (वय २१ वर्षे)

अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे .

- ऋतुराज दुबळे (वय २१ वर्षे)

- शंतनू शिंगाडे (वय २० वर्षे)

- अमन तांबोळी (वय २३ वर्षे)

जखमी तरुणांवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नव्या उड्डाणपुलावरील पहिलाच मोठा अपघात

कराड शहराजवळील हा सहापदरी उड्डाणपूल काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या दुर्घटनेत चार तरुणांचा मृत्यू झाल्याने कातरखटाव गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकत्र दर्शनासाठी गेलेल्या मित्रांवर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >