उबाठाने यापुढे बॅनरवर जिना आणि उमर खालिदचे फोटो लावावेत
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील उबाठाच्या दसरा मेळाव्यातून शरिया समर्थकांना पाठबळ देण्यात आले असून, ‘रिजिम चेंज’ची भाषा करणाऱ्या उमर खालिदच्या समर्थकांशी आणि दिमागी नक्षलींशी उद्धव ठाकरे यांची भाषा मिळतीजुळती असल्याचा हल्लाबोल मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी बुधवारी केला. उबाठाने यापुढे मेळाव्याच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी मोहम्मद अली जिना आणि उमर खालिद यांचे फोटो लावावेत, असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई : पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून गेल्या ...
सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना मंत्री राणे म्हणाले, शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात शरिया समर्थनाची भाषा करण्यात आली. आज ‘रिजिम चेंज’ची भाषा उमर खालिदचे समर्थक आणि दिमागी नक्षली करत आहेत. भारतात अराजकता निर्माण करून फ्रान्स, नेपाळ, बांगलादेश आणि इटलीसारखी परिस्थिती निर्माण करू इच्छिणाऱ्या शक्तींची आणि उद्धव ठाकरे यांची भाषा एकच असल्याचे स्पष्ट दिसते. ज्या अभिजीत दीपकेचे समर्थन उद्धव ठाकरे यांनी काल छातीठोकपणे केले, तो उमर खालिदचा समर्थक आहे आणि उमर खालिद हा अफजल गुरूचा समर्थक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे अफजल गुरूच्या समर्थकांचे समर्थन करत आहेत, असा आरोप राणे यांनी केला.
अफजल गुरूबाबत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे काय विचार होते, हे उद्धव ठाकरे यांनी वाचावे. भाषणांमध्ये बाळासाहेबांची वाक्ये वापरण्यापेक्षा त्यांनी बाळासाहेब म्हणत असलेले ‘आय अॅम अ मॅड मॅड हिंदू’ हे वाक्य बोलण्याची हिंमत दाखवावी. उद्धव ठाकरे यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी व्यासपीठाच्या मागील बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो लावण्याऐवजी मोहम्मद अली जिना आणि उमर खालिद यांचे फोटो लावावेत. ‘रिजिम चेंज’ची भाषा करणाऱ्या देशविरोधी शक्तींना काल शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जाहीर समर्थन दिले. बाळासाहेबांनी याच शिवाजी पार्कवरून हिंदुत्वाला बळ दिले, हिंदू राष्ट्र मजबूत करण्याची भूमिका मांडली आणि ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ ही घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. त्याच ठिकाणी त्यांचा मुलगा हिंदुद्वेषी लोकांचे समर्थन करताना दिसला, असे राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स खात्यावर केलेल्या विधानाचा निषेध करावा. राहुल गांधी यांनी संघाबाबत जे म्हटले ते चुकीचे होते, हे सांगण्याचे धाडस त्यांनी दाखवावे. राहुल गांधी व्हिएतनामला गेले म्हणून ‘रिजिम चेंज’ होणार आहे का? ‘रिजिम चेंज’ म्हणजे वडापावची गाडी आहे का, की उचलून बाजूला टाकायची? संजय राऊत यांच्या वक्तव्यांमधूनच उद्धव ठाकरे यांच्यात सरकार बदलण्याची क्षमता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माझ्या मालकाची तेवढी लायकी आणि औकात नाही, हे राऊत यांनीच सांगून टाकले आहे, अशा शब्दांत राणे यांनी टीका केली.
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत बोलण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलावे. उद्धव ठाकरे हे दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत गेले असून, महाराष्ट्रात आणि मुंबईत दाऊदचे काम करत आहेत, असा आरोप राणे यांनी केला. जिहादी, बांगलादेशी आणि रोहिंग्यांना ताकद देणे, त्यांच्यासाठी संघर्ष करणे आणि त्यांना जगवण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. मुंबईत अशांतता निर्माण करण्याच्या दाऊदच्या भूमिकेसारखीच भूमिका ठाकरे घेत आहेत. त्यामुळे दुसऱ्यांना लॉरेन्स बिश्नोई म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत राऊत यांनी बोलावे. दाऊदची शीरखुर्मा खाण्याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत उद्धव ठाकरे यांनी बोलू नये, असे राणे म्हणाले.
दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांच्या एफआयआरमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाचे नाव आहे. एका मुलीची हत्या आणि बलात्काराच्या प्रकरणात नाव आलेल्या उद्धव ठाकरे यांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत बोलणे हा हास्यजत्रेचा मोठा भाग आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्यांच्या मुलाच्या नाइटलाइफ गँगचा संबंध असल्याचा आरोपही राणे यांनी केला. त्या प्रकरणी आता तपास आणि चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.
सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियनवर बोला
- टायगर श्रॉफ यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आंतरराज्यीय समन्वय साधून २४ तासांत आरोपींना पकडण्याचे काम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले. आमच्या काळात कोणत्याही बॉलिवूड कलाकारावर किंवा नागरिकावर हल्ला झाल्यास पोलीस तत्परतेने कारवाई करतात आणि आरोपींना २४ तासांत पकडतात. उद्धव ठाकरे यांच्या काळात दिशा सालियन यांच्या पालकांना शवविच्छेदन अहवाल दिला जात नव्हता आणि सुशांतसिंह राजपूत यांचे शवविच्छेदनही व्यवस्थित झाले नव्हते, असा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला. आपल्या मुलाच्या कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी आम्ही पोलिसांचा वापर करत नाही किंवा खोटे गुन्हे दाखल करत नाही, असेही ते म्हणाले.
- शिवाजी पार्कवर पाकिस्तानची आणि जिहाद्यांची बाजू घेण्याचे काम करण्यात आले. बाळासाहेबांचे नाव घेऊन उमर खालिदला मदत करण्याची भाषा केली जात आहे. पाकिस्तानच्या कथित भूमिकेची री ओढणाऱ्या आणि जिहाद्यांना मदत करण्याची भाषा करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी उभे राहून भाषण केले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्रातील हिंदू समाज कधीही माफ करणार नाही. शिवाजी पार्कवर गोमूत्र शिंपडले पाहिजे, असेही राणे म्हणाले.
आदित्य ठाकरेच्या जेलवारीची चिंता करा
- संजय राऊत यांनी एप्रिलमध्ये मोदी सरकार पडेल, असे भाकीत केले. त्याबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले की, एप्रिलपर्यंत सरकार पडणार नाही आणि सरकार पडण्याची शक्यताही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयात आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांचा मुलगा डिसेंबर किंवा जानेवारी २०२७ पर्यंत मातोश्रीवर राहतो की नाही, याची राऊत यांनी आधी चिंता करावी. तो मातोश्रीवर बसून नववर्ष साजरे करतो की आर्थर रोड कारागृहात, हे काळ ठरवेल. आतापर्यंत राऊत यांनी सांगितलेल्या तारखा खऱ्या ठरलेल्या नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
- दरम्यान, शिवसेनेच्या गोरेगाव येथील दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची भावना व्यक्त झाल्याबाबत विचारले असता राणे म्हणाले की, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आणि आमदाराला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत असते. भाजपचे कार्यकर्ते आणि आमदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांना मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत होते. त्याचप्रमाणे शिंदे यांच्या मेळाव्यात त्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्री यांनी शिंदे यांचे नाव घेतले, तर त्यात चूक काय? त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपला नेता मोठा व्हावा, असे वाटणे हा त्यांचा अधिकार आणि कर्तव्य आहे. जसे भाजपच्या कार्यकर्त्यांना फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, तसे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना शिंदे यांच्याबाबत वाटू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींनी भारतविरोधी सुपारी घेतली का?
- राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवर टीका करताना राणे यांनी फ्रान्स, बेल्जियम, इटली आणि ब्रिटनमध्ये अराजकता निर्माण करणाऱ्या शक्तींना ते भेटत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी परदेशात गेल्यावर ‘डीप स्टेट’मधील लोकांना भेटल्याचे ट्वीट आणि छायाचित्रे आपण पाहिल्याचे ते म्हणाले. अशा शक्तींना भेटून भारतात परतल्यानंतर राहुल गांधी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाला आव्हान देतात.
- फ्रान्स, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती भारतात घडवण्याची सुपारीच राहुल गांधी यांनी घेतली आहे, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या व्हिएतनाम दौऱ्याचे राऊत यांनी समर्थन केल्याने उद्धव ठाकरे कमकुवत आहेत आणि त्यांच्यात ‘रिजिम चेंज’ करण्याची क्षमता नाही, यावर राऊत यांनी शिक्कामोर्तब केल्याचे राणे म्हणाले.
- राहुल गांधी परदेशात जातात, तेव्हा देशातील अर्बन नक्षली, दिमागी नक्षली आणि देशविरोधी जिहादी यांना पाठबळ देण्यासाठी आवश्यक असलेले ‘दूध’ आणण्याचे काम करतात. देशातील अशा शक्तींना बळ देण्यासाठीच राहुल गांधी परदेश दौरे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.