Thursday, October 22, 2026

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, दोषनिश्चितीवरील सुनावणी 27 तारखेपर्यंत पुढे

अशोक खरातने कारागृहातून बाहेर येण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला असला, तरी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी त्याला विरोध दर्शवला आहे.

Ashok Kharat : स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करून महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप असलेल्या अशोक खरातविरोधातील कायदेशीर कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणातील दोषनिश्चितीबाबतची सुनावणी येत्या २७ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २१) न्यायालयात सरकारपक्षातर्फे नमुना दोषनिश्चिती सादर करण्यात आली. दरम्यान, अशोक खरातने दाखल केलेल्या जामीन अर्जाला विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी विरोध केला आहे.

अशोक खरातचे कथित गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. १७ मार्च २०२६ रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पहिला गंभीर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तपासादरम्यान त्याच्याविरोधात अनेक गुन्हे नोंदवण्यात आले. महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांचा या प्रकरणांत समावेश आहे.

या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळण्याची अपेक्षा असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. खरातने कारागृहातून बाहेर येण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला असला, तरी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. आता २७ तारखेला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहा प्रकरणांतील दोषारोपपत्रे सत्र न्यायालयात

एसआयटी आणि सरकारवाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे. दाखल झालेल्या प्रमुख गुन्ह्यांपैकी सहा प्रकरणांतील दोषारोपपत्रे सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहेत. उर्वरित दोन प्रकरणांतील दोषारोपपत्रेही लवकरच न्यायालयात दाखल केली जाणार असल्याची माहिती आहे. आगामी सुनावणी आणि जामीन अर्जावरील न्यायालयाचा निर्णय यामुळे अशोक खरातविरोधातील प्रकरणाला पुढील दिशा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भोंदू खरातभोवतीचा कायद्याचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >