Thursday, October 22, 2026

कोणीही उठून ५०० कोटी दिल्याचे सांगितले, म्हणजे पुरावा झाला का? - आ. निलेश राणे यांचा मनोज जरांगे पाटील यांना सवाल

मुंबई : "कोणी तरी एकाकडून पैसे घेऊन दुसऱ्याला ५०० कोटी रुपये दिले, असे बोलले म्हणजे तो पुरावा ठरतो का?" असा सवाल शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या दाव्यावर राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ऐकीव माहितीच्या आधारे आरोप करणे योग्य नसल्याचे सांगतानाच, अशा चर्चांचा कोकणात रोज अनुभव येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये काही राजकीय नेत्यांची नावे आणि आर्थिक व्यवहारांसंदर्भातील उल्लेख असल्याचा दावा जरांगे यांनी केला. त्यांच्या विरोधात राजकीय षड्यंत्र रचले जात असून, मराठा आंदोलनात बाधा आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

जरांगे यांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आमदार निलेश राणे म्हणाले, "कोणीतरी बोलणार, एकाकडून घेऊन दुसऱ्याला ५०० कोटी दिले, म्हणजे पुरावा झाला का? कोकणातील विविध ठिकाणी रोज कोणीतरी पैसे घेतल्याच्या किंवा कोणाला पैसे दिल्याच्या चर्चा होत असतात. मात्र, अशा चर्चांचा बोलणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला फारसा फरक पडत नाही, कारण अनेकदा त्या कोणाकडून तरी ऐकलेल्या माहितीवर आधारित असतात. जरांगे पाटील यांच्यात थोडीतरी माणुसकी आणि लाज जिवंत असायला हवी होती," अशा शब्दांत राणे यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर टीका केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >