Nashik : नाशिकचा पक्षी कोण ? कावळा की गिधाड ! नाशिककरांना ऑनलाइन मतदानाची संधी

‘आपलं पर्यावरण’ संस्थेचा अनोखा उपक्रम; क्यूआर कोडद्वारे मतदान, १२ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार

नाशिक : नाशिक शहराचा अधिकृत पक्षी निवडण्यासाठी आता नाशिककरांना ऑनलाइन मतदान करता येणार आहे. ‘आपलं पर्यावरण’ संस्थेच्या पुढाकारातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत असून, कावळा आणि गिधाड या दोन पक्ष्यांमध्ये निवडीची चुरस रंगणार आहे. मतदानासाठी तयार करण्यात आलेल्या क्यूआर कोडचे अनावरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही पक्ष्यांच्या समर्थनार्थ प्रचारालाही सुरुवात झाली आहे.


दरवर्षी ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान साजऱ्या होणाऱ्या पक्षी सप्ताहाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पक्ष्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि नाशिक शहराची पक्षी ओळख निश्चित करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.



महापौरांनी केले पहिले मतदान


विजयादशमीच्या मुहूर्तावर मंगळवारी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी पहिले मतदान करून या उपक्रमाचा प्रारंभ केला. यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या पसंतीच्या पक्ष्याला मतदान करण्याचे आवाहन केले. महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि वनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनीही या पर्यावरणपूरक उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांतून त्यांनी नागरिकांना मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले.



पक्षी संवर्धनासाठी अनोखी निवडणूक


नाशिकचा पक्षी निवडण्यापुरताच हा उपक्रम मर्यादित नसून, पक्ष्यांच्या विविध प्रजातींसमोर निर्माण झालेली आव्हाने आणि त्यांच्या संवर्धनाची गरज याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे हा त्यामागील व्यापक हेतू आहे. ‘आपलं पर्यावरण’ संस्थेचे अध्यक्ष, पक्षी व वृक्ष अभ्यासक शेखर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका, जिल्हा प्रशासन आणि वनविभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून भावी पिढीमध्ये पर्यावरण आणि जैवविविधतेविषयी संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.



१० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन मतदान


नाशिककरांना आपल्या पसंतीच्या पक्ष्याला ऑनलाइन मतदान करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करता येईल. मतदानासाठी लिंक : [aaplaparyavaran.org/nashik-emblem.html](https://aaplaparyavaran.org/nashik-emblem.html) या निवडणुकीचा निकाल १२ नोव्हेंबर रोजी महापौर हिमगौरी आडके जाहीर करणार आहेत. त्यामुळे नाशिककर कोणत्या पक्ष्याला पसंती देतात, याकडे पर्यावरणप्रेमींसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.



मतपत्रिकेवर कावळा आणि गिधाडच का ?


नाशिकला रामायणकालीन पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. रामायणातील जटायू हा गिधाडाशी संबंधित महत्त्वाचा संदर्भ असून, गिधाडांच्या संवर्धनाचा मुद्दाही या निवडीच्या निमित्ताने अधोरेखित होत आहे. नाशिकमधील अंजनेरी आणि ब्रह्मगिरी पर्वतरांगांचा परिसर गिधाडांसाठी नैसर्गिक अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. दुसरीकडे, कावळ्यालाही नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत विशेष स्थान आहे. रामकुंड परिसरात पूर्वजांच्या दशक्रिया विधीसाठी विविध भागांतून भाविक येतात. या विधीमध्ये काकस्पर्शाला धार्मिक महत्त्व असल्याची श्रद्धा आहे. याच सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संदर्भांमुळे कावळा आणि गिधाड या दोन पक्ष्यांचा निवडीसाठी विचार करण्यात आल्याचे शेखर गायकवाड यांनी सांगितले.



नागरिकांच्या सहभागातून पक्षी संवर्धनाचा संदेश


नाशिक शहराचा पक्षी निवडण्याच्या या उपक्रमामुळे नागरिकांना पर्यावरण संवर्धनाच्या प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. ऑनलाइन मतदानाच्या माध्यमातून पक्ष्यांविषयी उत्सुकता निर्माण होण्यासोबतच त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण, जैवविविधतेचे महत्त्व आणि दुर्मीळ पक्ष्यांच्या संवर्धनाची गरज याबाबतही चर्चा होण्याची अपेक्षा आहे. आता नाशिककरांच्या मतदानातून कावळा की गिधाड, यापैकी कोणता पक्षी शहराची ओळख ठरणार, याचा फैसला होणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत थेट तिसरा क्रमांक

Mumbai News: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. IQAir च्या

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘हर घर भगवा’ अभियान ; इंदूर, अहिल्यानगरमधून नाशिकमध्ये भगवे ध्वज येण्यास सुरुवात

नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक

CA Intermediate : CA इंटरमिजिएट सप्टेंबर 2026 चा निकाल आज जाहीर होणार? विद्यार्थ्यांचे लक्ष अधिकृत वेबसाइटकडे

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या CA इंटरमिजिएट सप्टेंबर 2026 परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी

Dhule : धुळे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी दिशा, बोरविहीर-नरडाणा आणि मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्प निर्णायक टप्प्यावर

Dhule : धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे बोरविहीर-नरडाणा आणि मनमाड-इंदूर हे

Land Registration Rules : सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक, फसवणूक रोखण्यासाठी महसूल विभागाचा निर्णय

मुंबई : सामायिक सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांत सहहिस्सेदारांची फसवणूक

Asian Para Games : भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती....

नागोया : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्सदरम्यान भारतीय पथकाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे.