Thursday, October 22, 2026

दक्षिण अफ्रिकेचं कमबॅक, ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 31 धावांनी नमवलं! WTC गुणतालिकेत असा बदल

दक्षिण अफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा वचवा दुसऱ्या सामन्यात काढला. ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 31 धावांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाच्या दारूण पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेत दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर 1-1 अशी स्थिती झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला 214 धावांनी पराभूत केलं होतं. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 31 धावांनी पराभूत केलं. दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 9 गडी गमवून 425 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ अवघ्या 99 धावांवर बाद झाला. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला. फॉलोऑन मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलिया कसं उत्तर देणार? याकडे लक्ष लागून होतं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावातही 295 धावा करून शकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 31 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

टेम्बा बावुमा विजयाचा शिल्पकार

दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा या विजयाचा शिल्पकार ठरला. पहिल्या डावात खरं तर दक्षिण अफ्रिकेची नाजूक स्थिती असती. पण टेम्बा बावुमाने झुंजार खेळी केली. त्याने चौथ्या स्थानावर फलंदाजी करत 334 चेंडूंचा सामना केला आणि 179 धावा केल्या. टेम्बा बावुमाने सात जणांसोबत भागीदारी केली. अकरमॅनसोबत 13 धावांची, मॅथ्यू ब्रीत्झकेसोबत 15, रयान रिकल्टनसोबत 52, वियान मुल्डरसोबत 18, मार्को यानसेनसोबत 132, सिमॉन हार्मरसोबत 183 धावांची भागीदारी केली. टेम्बा बावुमाला या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलटफेर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या गुणतालिकेवर या निकालाचा परिणाम दिसून आला आहे. ऑस्ट्रेलिया पराभवानंतरही पहिल्या स्थानावर आहे. पण त्यांच्या विजयी टक्केवारीत घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी या सामन्याच्या निकालापूर्वी 81.82 टक्के होती. मात्र त्यात घसरण होऊन 75 टक्के झाली आहे. तर दक्षिण अफ्रिकेच्या विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी 60 टक्के होती. या सामन्याच्या निकालानंतर विजयी टक्केवारी 75 टक्के झाली आहे. या निकालामुळे भारताचा कस लागणार आहे. कारण दुसरं स्थान मिळवण्यासाठी समीकरण बदललं आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >