Thursday, October 22, 2026

Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या घरी चिमुकल्या परीचे थाटात स्वागत ! लेकीची पहिली झलक पाहून चाहतेही भारावले

'माझी लाडाची लक्ष्मी आली सोन पावली’ म्हणत सूरजने शेअर केला खास व्हिडीओ; सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Suraj Chavan : आपल्या साध्या स्वभावामुळे, खास बोलण्याच्या शैलीमुळे आणि ‘गुलिगत’ अंदाजामुळे लोकप्रिय झालेला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सूरजच्या आयुष्यात एका नव्या आनंदाचे आगमन झाले असून, तो बाबा झाला आहे. त्याच्या चिमुकल्या लेकीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता सूरजने आपल्या लाडक्या लेकीचे घरी थाटामाटात स्वागत केले असून, या खास क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

लेकीच्या स्वागतासाठी घराची खास सजावट

सूरज चव्हाणने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेकीच्या स्वागताचा सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये घराची फुलांनी आकर्षक सजावट केलेली दिसत आहे. आपल्या चिमुकल्या परीला घरी आणताना सूरजचा आनंद पाहण्यासारखा आहे. व्हिडीओमध्ये त्याने लेकीची झलकही दाखवली आहे. या व्हिडीओला सूरजने, ‘माझी लाडाची लक्ष्मी आली सोन पावली’ असे भावनिक कॅप्शन दिले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला असून, व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

जन्माष्टमीच्या दिवशी घरी आले ‘राधा’चे आगमन

सूरज चव्हाणच्या घरी कृष्णजन्माष्टमीच्या शुभदिनी कन्यारत्नाचे आगमन झाल्याची आनंदाची बातमी समोर आली होती. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘घरी राधा आली आहे’ असे म्हणत चाहत्यांसोबत हा आनंद शेअर केला होता. लेकीला पहिल्यांदा पाहिल्यानंतर सूरज भावूक झाल्याचेही समोर आले होते. त्याने पत्नीला मिठी मारून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता लेकीच्या स्वागताचा व्हिडीओ शेअर करत त्याने आपल्या आयुष्यातील या नव्या पर्वाची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

 

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सूरजचा हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने, ‘तुझं जग बदलताना पाहिलं सूरज… याहून सुंदर गोष्ट कोणतीच नाही,’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तर आणखी एका चाहत्याने सूरजच्या घरी मुलीच्या रूपाने साक्षात लक्ष्मी आली असल्याची प्रतिक्रिया दिली. अनेक चाहत्यांनी सूरज आणि त्याच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संघर्षातून आणि वेगळ्या व्यक्तिमत्त्वातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या सूरजच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण पाहून चाहतेही भावुक झाले आहेत.

‘गुलिगत स्टार’च्या आयुष्यात नवी सुरुवात

‘बिग बॉस मराठी ५’मधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या सूरज चव्हाणच्या आयुष्यात आता वडील म्हणून नवी जबाबदारी आली आहे. त्याच्या साधेपणावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठीही हा क्षण खास ठरला आहे. लेकीच्या आगमनामुळे सूरजच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, तिच्या स्वागताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सूरजच्या ‘लाडक्या लक्ष्मी’च्या आगमनानंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरूच असून, त्याच्या कुटुंबाच्या आनंदात चाहतेही सहभागी होत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >