Thursday, October 22, 2026

BMC Fixed Deposits : महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्द्यावरून थेट पक्षांतरवर घसरले नगरसेवक

परंतु जर आपण अशाप्रकारचे निष्ठेबाबत पक्षांतराबाबत बोलणार असाल तर त्याबाबत आम्ही बोललो तर अस्वस्थ होवू नका असे सांगत विरोधकांची बोलतीच बंद केली.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महापालिकेतील मुदतठेवींमधील रक्कम कमी होत असल्याने याबाबत चिंता व्यक्त करत विरोधकांनी महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. मात्र, विरोधकांकडून ही मागणी होत असतानाच त्यांच्या नगरसेवकांकडून चक्क पक्षातील निष्ठेबद्दल बोलले गेले. त्यामुळे याचा समाचार घेत शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची पुरती लाज काढून आम्हाला पक्षांतर करण्याचा निर्णय घ्यावा लागला याचा उलगडाच केला. एवढेच नाही तर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही यावर रि ओढत अशाप्रकारची चर्चा होणे योग्य नाही. परंतु जर आपण अशाप्रकारचे निष्ठेबाबत पक्षांतराबाबत बोलणार असाल तर त्याबाबत आम्ही बोललो तर अस्वस्थ होवू नका असे सांगत विरोधकांची बोलतीच बंद केली.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अ, ब, ई , वृक्ष प्राधिकरण आणि ग मधील विविध निधींमध्ये शिल्लक असलेला रकमा दर्शवणारा तिमाही अहवाल महापालिका स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. यामध्ये ३१ मार्च २०२६ रोजी असणारा या त्रैमासिक आर्थिक अहवाल माहितीसाठी सादर करण्यात आला होता. यावर बोलतांना काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी महापालिकेचा वित्त विभाग दिशाभूल करत असल्याचा आरोप करत तीन महिन्यांमध्ये सादर करण्यात येणारा हा अहवाल आज ऑक्टोबर महिन्यात येत असल्याचे सांगितले. ९१ हजार कोटींच्या मुदत ठेवींमधील रक्कम आता ७७ हजार कोटींवर आलेली आहे. त्यामुळे यावर श्वेतपत्रिका काढण्यात यावी अशी मागणी केली. तर उबाठाचे शैलेश फणसे यांनी महापालिकेचा निधी कुठे खर्च केला जातो, मुदतठेवींमधून का काढला जातो याची माहिती येणे आवश्यक आहे. कोस्टल रोडसाठी फंजिबल एफएसआयमधून निधी उभारण्यात आला होता. नगरसेवक निधीतून जो खर्च केला जातो त्यातील अधिकाधिक खर्च जीएसटी आणि इतर करांवरच होतो,असे सांगितले. तर अजंता यादव यांनी शौचालय दुरुस्तीसाठी फंड मिळत नसल्याची खंत मांडली. यावर दरेकर यांनी विरोधकांना याची चिंता नसावी,असे सांगत आम्ही पादर्शक आणि स्वच्छ प्रशासन देत असल्याचे सांगितले.

यावर माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी सत्ताधारी पक्ष कोण आणि विरोधी पक्ष कोण हे महत्वाचे नसून जनतेची आपल्याला सेवा करायची आणि महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दोघांनाही प्रयत्न करावे लागतील असे सांगितले. त्यानंतर लक्ष्मी भाटीया यांनी आम्हाला निधी देत नाही. आम्ही जनतेचीच कामे करतो ना असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर निधी पाहिजे असेल तर या समोरच्या बाजुला येवून बसा अशी कोपरखळी सत्ताधाऱ्यांनी मारली. यावर आम्ही निष्ठावान आहोत, आम्हाला दुसऱ्या पक्षात जायची गरज नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला

यावर शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी महापालिका जेव्हा मार्च २०२२ रोजी संपुष्टात येणार होती, तेव्हा जर तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापालिकेची निवडणूक घेतली असती तर प्रशासक बसला नसता आणि ही वेळ आली नसती. आणि निष्ठेचे बोलाल तर जी महिला हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बोलली होती, त्यांनाच आता उबाठात डोक्यावर घेवून फिरले जाते. आणि जेव्हा आमच्यावर संकट आले तेव्हा तुमचे तुम्ही बघा असे सांगून हात वर केले म्हणून आम्हाला परिस्थितीमुळे निर्णय घ्यावा. त्यामुळे कुणी पुन्हा पक्षांतरावर बोलू नये.

तर गणेश खणकर यांनी २०१७ ते २०२२मध्ये भाजपच्या नगरसेवकांना निधी मिळाला नव्हता. तेव्हा आमचे नगरसेवक काय जनतेची सेवा करत नव्हते का असा सवाल करत करून दाखवल्याचे श्रेय आपण घेतले पण सत्तेसाठी तुम्ही आम्हाला विसरलात असा सवाल केला.

यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मागील महापालिकेत आम्हाला निधी मिळाला नव्हता. आंदोलन करूनही निधी दिला नव्हता.तेव्हा आम्ही तत्कालिन अध्यक्षांना भेटलो, पण त्यावेळी त्यांनी पक्षप्रमुखांनी भाजपला निधी देवू नये अशा मला सूचना असल्याचे सांगितले. त्यामुळे आधी आपल्या पक्षप्रमुखांना विचारुन या की आम्ही आपल्याला निधी का दिला नाही तो. आणि एखादा माणूस ४० ते ४५ वर्षे सेवा केल्यानंतर तो पक्ष सोडतो तेव्हा त्याची काय अवस्था होत असेल याची कल्पना करा, कुणीही स्वत:च्या मर्जीने पक्ष सोडत नाही. त्यामुळे चांगल्या विषयावर निष्ठा आणि पक्षांतरावर चर्चा व्हायला नको होती,असे सांगत महापालिकेच्या मुदत ठेवी आणि खर्चाची माहिती पुढील बैठकीत सादर करेपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवत असल्याची घोषणा त्यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >