मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील औषधाचे दुकान चालवण्याची जागा पुन्हा एकदा निविदा न मागवता परस्पर पाच वर्षांनी करार वाढवून देण्याचा प्रस्ताव सर्वच सदस्यांच्या विरोधानंतर अध्यक्षांनी राखून ठेवला. एका बाजुल महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी निविदा न काढता जुन्याच दराने भाडेकरारावर देतानाच रुग्णांना मात्र केवळ १२.५ टक्के सवलतील औषधे देण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात रुग्णांची लूट संबंधित औषधाच्या दुकान चालकाकडून होत असल्याने कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देवून नये. तसेच याठिकाणी जेनेरिक औषधाचे दुकान सुरु केले जावे अशी मागणी सुधार समिती सदस्यांनी केली.
मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णलयातील औषधांचे दुकान चालवण्यासाठी विद्यमान कंत्राटदार दि परेल केमिस्ट यांना पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपचे प्रकाश गंगाधरे यांनी २०१२ पासून आपण या औषध दुकानाला मुदतवाढ देत आहोत. आपण पाच वर्षांनी याला मुदतवाढ का असा सवाल करत यासाठी औषध दुकानदारांकडून स्वारस्य अर्ज मागवून अधिकाधिक सवलत आणि जास्त पैसे देणाऱ्या कंपनीची निवड केली जावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जेनेरीक औषधे उपलब्ध व्हावीत म्हणून दुकानाला जागा द्यायला हवी. त्यामुळे प्रस्तावातील प्रत्येक मुद्दयावरून त्यांनी भाष्य करत प्रशासनासमोर प्रश्न उपस्थित केला.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील वाढते वायू प्रदुषण आणि धुळीचे प्रदुषण रोखण्याचा प्रयत्न महापालिकेच्या पर्यावरण विभागाचा माध्यमातून केला जात असून ...
यावर उबाठाचे सचिन पडवळ यांनी संबंधित औषधाच्या दुकानांसाठी सन २०१२ पासून मुदतवाढ देत आहोत. ते आपल्या रुग्णाला १२.५ टक्के सवलत देत आहेत. जिथे बाहेर आपल्या रुग्णाला २० ते २२ टक्के सवलत मिळते. त्यामुळे तीन ते चार महिन्यांमध्ये नवीन निविदा मागवण्यात यावी तसेच पुअर मेडिकल फंडमध्ये दिल्या जाणाऱ्या २५ टक्के रकमेच्या तुलनेत ५० टक्के रक्कम घेतली जावी अशी सूचना करत याला मुदतवाढ देण्यास विरेाध केला. भाजपच्या स्वप्ना म्हात्रे यांनी पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यासाठी प्रशासनातील कोणते अधिकारी यांचा हात आहे याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
भाजपचे संदीप पटेल यांनी आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व रुग्णालयांत जेनेरीक औषधांची दुकाने सुरु करण्यात यावी अशी मागणी केली. काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी एम्सच्या रुग्णालयांमधील औषधांच्या दुकानांमध्ये ३० टक्के सवलत दिली जाते तर मग आपल्या रुग्णालयात १२.५ टक्के सवलत का असा सवाल केला. त्यामुळे एक वर्ष मुदतवाढ नको तर निविदा अंतिम होईपर्यंतच सवलत दिली जावी अशी सूचना केली.
बाळा तावडे यांनी केईएम रुग्णालयातील औषधांच्या दुकानांची मुदतवाढ देण्याऐवजी आधीच निविदा व्हायला हवी होती अशी मागणी केली. त्यामुळे प्रशासन झोपले होते का असा सवाल केला. तर उबाठाच्या उर्मिला पांचाळ यांनी संबंधित दुकानदाराकडून रुग्णांची लूट होत असून कमी दर असताना औषधे अधिक दराने विक्री केली जाते. तसेच जेनेरिक औषधांची दुकाने सुरु करु नये. या औषधांचा परिणाम कमी असतो असे सांगत रुग्णांना अधिकाधिक सवलत देणाऱ्या औषध विक्रेत्याचे दुकान सुरु करावे अशी सूचना केली.
तर मनसेच्या सुप्रिया दळवी यांनी संबंधित औषध दुकानदाराविरोधात प्रचंड तक्रारी येत असून प्रत्यक्षात रुग्णांकडून जास्त पैसे आकारत असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीत राजा रहेबर खान आणि मेहेर हैदर यांनीही भाग घेतला. यानंतर सदस्यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्दयांची उत्तरे सादर करेपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवण्यात येत असल्याचे सुधार समिती अध्यक्षा संध्या दोषी यांनी सांगितले.