Friday, October 23, 2026

Loktak Lake Manipur : 'लोकटक तलावा'च्या संवर्धनासाठी मणिपूर सरकारचा मोठा निर्णय, 'लोकटक दिन' आता राज्य महोत्सव

मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'लोकटक दिन' (Loktak Day) आतापासून दरवर्षी अधिकृत 'राज्य महोत्सव' म्हणून साजरा करण्याचा एकसंधी निर्णय घेण्यात आला आहे.

इंफाळ : ईशान्य भारतातील सर्वांत मोठ्या गोड्या पाण्याच्या 'लोकटक तलावा'चे सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व सर्वदूर पोहोचवण्यासाठी मणिपूर सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'लोकटक दिन' (Loktak Day) आतापासून दरवर्षी अधिकृत 'राज्य महोत्सव' म्हणून साजरा करण्याचा एकसंधी निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे या जागतिक दर्जाच्या नैसर्गिक वारशाचे जतन होण्यास आणि त्याच्या संवर्धनाबाबत जनजगृती वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

मंत्रिमंडळाची बैठक आणि आयोजनाची रूपरेखा

 

राजधानी इम्फाल येथील मंट्रिपूख्री परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंचांगानुसार दरवर्षी 'मेरा' महिन्याच्या पौर्णिमेला (मेराचा थनिल) हा सोहळा राज्य पातळीवर उत्साहात साजरा केला जाईल. विशेष म्हणजे, यावर्षीचा हा महोत्सव दोन वेगवेगळ्या प्रमुख ठिकाणी पार पडणार आहे. थंगा येथील लोकटक लैरेम्बी ग्राउंड आणि कोमलाखोंग येथे या महोत्सवाचे आयोजन केले जाईल. लोकटक विकास प्राधिकरण, स्थानिक नागरिक, विविध क्लब आणि प्रशासन यांच्या संयुक्त सहभागातून हा भव्य सोहळा संपन्न होईल.

लोकटक तलावाचे भौगोलिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्य

मणिपूरमधील मोइरांग येथे असलेला लोकटक तलाव हा ईशान्य भारतातील गोड्या पाण्याचा सर्वांत विशाल तलाव मानला जातो. या तलावाचे सर्वात मोठे आणि अनोखे आकर्षण म्हणजे येथील 'फुम्दी' (Phumdis) होय. पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती, माती आणि सेंद्रिय कचऱ्यापासून तयार झालेले हे नैसर्गिक थर या तलावाची मुख्य परिसंस्था आहेत, जे विविध जलचर आणि वनस्पतींना जीवनदान देतात. या तलावावर केवळ जैवविविधताच अवलंबून नसून, स्थानिक नागरिकांची मासेमारी, शेती आणि रोजगाराची अनेक साधने यावरच चालतात. मणिपूरची अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यसंपदा अनुभवण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येथे आवर्जून भेट देतात.

अनन्यसाधारण महत्त्व आणि 'किबुल लामजाओ' राष्ट्रीय उद्यान

लोकटक तलावाचे महत्त्व केवळ सौंदर्यापुरता मर्यादित नसून, या तलावाच्या दक्षिण भागात 'किबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान' वसलेले आहे. हे जगातील एकामेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते. मणिपूरचे राज्यप्राणी असलेले आणि विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचलेले अत्यंत दुर्मिळ 'संगाई हरीण' (ज्याला डान्सिंग डीयर किंवा नाचणारे हरीण असेही म्हणतात) याच राष्ट्रीय उद्यानात सुरक्षित नैसर्गिक अधिवासात नांदतात. त्यामुळे हा तलाव केवळ एक जलस्त्रोत नसून मणिपूरच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा कणा मानला जातो.

संवर्धनाची गरज आणि आगामी उपक्रम

सध्या हा ऐतिहासिक आणि सुंदर लोकटक तलाव वाढते प्रदूषण, पाण्याची बदलती पातळी आणि परिसंस्थेवर येणारा ताण यांसारख्या गंभीर पर्यावरणीय संकटांचा सामना करत आहे. येथील समृद्ध जैवविविधतेचे रक्षण करणे आणि तलावावर अवलंबून असलेल्या घटकांचे भविष्य सुरक्षित करणे ही काळाची गरज बनली आहे. आगामी काळात आयोजित होणाऱ्या 'लोकटक दिन' महोत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक खेळ, आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध संवर्धनाचे उपक्रम राबवले जाणार आहेत, जेणेकरून लोकांमध्ये या बहुमूल्य नैसर्गिक संपत्तीच्या रक्षणाबद्दल अधिक जाणीव निर्माण होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >