Friday, October 23, 2026

Mumbai Local Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! रविवारी मेगाब्लॉक; कधी, कुठे असेल? जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Local Mega Block: येत्या रविवारी अर्थात, 25 ऑक्टोबर 2026 रोजी मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडण्याआधी मुंबई लोकलच्या मेगाब्लॉकचं 'हे' वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडाल.

मुंबई: प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी अर्थात, 25 ऑक्टोबर 2026 रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो रविवारी घरातून बाहेर निघण्याआधी नक्कीच हे रेल्वेचं वेळापत्रक वाचा. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान आणि हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गिकेवरील माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 03.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सकाळी 10.36 ते दुपारी 03.10 वाजेपर्यंत सुटणाऱ्या 'डाऊन' जलद मार्गावरील लोकल सेवा माटुंगा स्थानकावरून 'डाऊन' धिम्या मार्गावर वळवल्या जातील. सर्व लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सर्व नियोजित स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या सर्व जलद लोकल मुलुंड स्थानकावर पुन्हा 'डाऊन' जलद मार्गावर वळवल्या जातील.
ठाणे स्थानकावरून सकाळी 11.03 ते दुपारी 03.38 वाजेपर्यंत सुटणाऱ्या 'अप' जलद मार्गावरील सर्व लोकल मुलुंड स्थानकावर 'अप' धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या सर्व लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान सर्व नियोजित स्थानकांवर थांबतील, त्यानंतर माटुंगा स्थानकावर पुन्हा 'अप' जलद मार्गावर वळवल्या जातील आणि या सर्व लोकल आपल्या गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. खोपोली स्थानकावरून दुपारी 01.48 वाजता सुटणारी खोपोली- मुंबई सीएसएमटी लोकल पुनःनिर्धारित वेळेनुसार दुपारी 02.06 वाजता सुटणार आहे.
हार्बर लाईन मार्गिकेवरील, कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' हार्बर लाईनवर सकाळी 11.10 ते सायंकाळी 04.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सकाळी 10.34 ते दुपारी 03.36 या वेळेत वाशी/ बेलापूर/ पनवेल येथे जाणाऱ्या 'डाऊन' हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सकाळी 10.17 ते दुपारी 03.47 या वेळेत मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व 'अप' हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत मुंबई सीएसएमटी– कुर्ला– मुंबई सीएसएमटी आणि पनवेल– वाशी– पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ट्रान्स-हार्बर मार्ग आणि उरण पोर्ट मार्गावरील सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार चालतील. तर, हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे- वाशी/ बेलापूर/ पनवेल स्थानकांद्वारे प्रवास करण्याची मुभा असेल. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिर आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >