Friday, October 23, 2026

Akshay Kumar: टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारला धसका? अभिनेत्याने उचलले मोठे पाऊल

टायगर श्रॉफ यांच्या कारवरील गोळीबाराच्या तपासात अक्षय कुमार यांच्या घरासह अनेक नामांकित कलाकारांच्या घरांची रेकी झाल्याचं समोर आल्यानंतर अक्षय कुमार यांच्या जुहूतील घराला बुलेटप्रूफ काचेचे कवच बसवण्यात येत आहे.

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर 18 ऑक्टोबरला जुहू येथे तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. टायगर श्रॉफवर केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीची सुरक्षा व्यवस्था ढवळून निघाली आहे. या प्रकरणाच्या तपासात आरोपींनी अक्षय कुमार, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह अनेक नामांकित कलाकारांच्या घरांची रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अनेक सेलिब्रिटींनी आपल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ केली आहे. त्या यादीमध्ये सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचाही समावेश आहे. अक्षय कुमारने आपल्या जुहूतील निवासस्थानाला बुलेटप्रुफ काचेचे कवच बसवण्याचे काम सुरू केले आहे. शिवाय, अभिनेत्याने आपल्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तातही वाढ केली आहे.

फक्त अभिनेता अक्षय कुमारनेच नाही तर, बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खाननेही आपल्या घरातील बुलेटप्रुफ काचा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अनेक बॉलिवू़ड सेलिब्रिटींच्या घरी हे महत्त्वाचं काम सुरू आहे. यापूर्वी सुद्धा सलमानच्या घराला बुलेटप्रुफ काचा होत्या. पण आता त्या पुन्हा नवीन अपग्रेड केल्या जात आहेत. गोळीबार प्रकरणामुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. अक्षयने त्याच्या घराबाहेर पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. टायगरवर हल्ला झाल्यानंतर अक्षयच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सलमान खानला 'Y+' दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून तो सध्या मुंबई बाहेर आहे. आमिर खान आणि रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरही गस्त वाढवण्यात आली आहे.

टायगर श्रॉफपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार हे बडे सेलिब्रिटी बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते. आरोपींनी अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्या घरांची रेकी देखील केली होती. लॉरेन्स गँगच्या अनिल पंडित याने मोठ्या स्टारला टार्गेट करण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले. शूटर्सने अभिनेत्यांच्या घरांची रेकी करून व्हिडिओ आरोपी अनिल पंडितला पाठवले होते. पण कडेकोट सुरक्षेमुळे त्याला प्लॅन बदलावा लागला. त्यानंतर टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला गेला. टायगरच्या घराची आठवडाभर रेकी केल्यानंतर त्यावर हल्ला करण्यात आला. गोळीबारामध्ये, तीन अज्ञातांनी टायगरच्या कारवर पाच ते सहा गोळ्या झाडल्या होत्या. घटनेमध्ये अभिनेता सुखरूप आहे.

अभिनेता जरीही सुखरूप असला तरीही अभिनेत्याचा कार चालक आणि एका पादचारी या घटनेमध्ये जखमी झाले होते. जखमी उमेश चौहान यांच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या यकृतात अडकलेली गोळी काढण्यासाठी ही जटील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना (रेहान आर, फूल सिंह आणि रितिक कुमार) कोट्यातून अटक करून 21 ऑक्टोबरला न्यायालयाने 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी, हरियाणातील कुणाल, सुमित आणि उत्तर प्रदेशातील राधा, बबिता या आणखी चार आरोपींनाही अटक केली आहे. शस्त्रे पुरवणाऱ्या चार संशयितांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 20 ऑक्टोबरला अटक केली. तपासात बिश्नोई टोळीचा कथित सहकारी अनिल पंडित याचे नाव कट रचणारा म्हणून समोर आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >