Friday, October 23, 2026

Devendra Fadnavis : मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ करणे हेच पायाभूत सुविधा विकासाचे उद्दिष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

शीव रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव - मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्‍न

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज महानगर बनविण्याच्या दृष्टीने रस्ते, किनारी रस्ता, उड्डाणपूल आणि बोगद्यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. मुंबईत उत्तर - दक्षिण आणि पूर्व - पश्चिम कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करून महानगराच्‍या एका भागातून दुसऱ्या भागात कमीत कमी वेळेत पोहोचता यावे, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, वेळेची बचत व्हावी, यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रयत्‍नशील आहे. महानगराच्‍या विकासासाठी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेले अनेक प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहेत. या प्रकल्पांची गती कायम ठेवणे, त्यांच्यातील अडथळे दूर करणे आणि सर्व संबंधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राखणे, या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पायाभूत सुविधांच्या विकासाचा खरा अर्थ म्हणजे ‘इझ ऑफ लिव्हिंग’ अर्थात मुंबईकरांचे जीवन अधिक सोपे, सुलभ आणि सुखकर करणे हा होय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेले सर्व पायाभूत सुविधा प्रकल्प ठरवलेल्या वेळेत आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता पूर्ण करावेत, असे निर्देश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव - मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते दृकश्राव्य (व्हर्च्युअल) पद्धतीने, मुख्यमंत्री महोदयांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा बंगला' येथून गुरुवारी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर तथा कार्यक्रमाच्या अध्यक्ष रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, खासदार अनिल देसाई, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमीत साटम, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, शिवसेना गटनेते अमेय घोले, स्‍थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष संगीता शर्मा, एन प्रभाग समिती अध्यक्ष अश्विनी मते, एफ दक्षिण व एफ उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा मानसी सातमकर, बाजार व उद्यान समितीचे उपाध्यक्ष भास्कर शेट्टी, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेविका राखी जाधव, नगरसेवक सुरेश आवळे, नगरसेविका निर्मिती कानडे, नगरसेविका अर्चना भालेराव, नगरसेविका प्रिती सातम, नगरसेवक अॅड. सुहास वाडकर, नगरसेवक श्री. तुळशीराम शिंदे, नगरसेवक श्री. सुषम सावंत आदी मान्यवर दृकश्राव्य प्रणालीद्वारे या सोहळ्यात सहभागी झाले. तर, महानगरपालिका आयुक्‍त अश्विनी भिडे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर हे वर्षा बंगला येथे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, मुंबई महानगर आज विकासाच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभे आहे. गत काही वर्षांत मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची आर्थिक राजधानी नाही, तर ती देशाच्या आर्थिक विकासाचे एक महत्त्वाचे इंजिन आहे. त्यामुळे मुंबईचा विकास करताना आपण केवळ आजच्या गरजांचा विचार करत नाही, तर पुढील २५ ते ५० वर्षांच्या नियोजन डोळ्यांसमोर ठेवून काम करत आहोत. आज मुंबईमध्ये काँक्रीटचे रस्ते, कोस्टल रोड, विविध उड्डाणपूल, बोगदे आणि इतर महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने पुढे जात आहेत. या प्रत्येक प्रकल्पाकडे आपण स्वतंत्रपणे पाहू शकत नाही. हे सर्व प्रकल्प एकमेकांना जोडणाऱ्या एका व्यापक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. कोस्टल रोडसारख्या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला एक नवी दिशा मिळत आहे. त्याचबरोबर रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम करणे, वाहतुकीतील अडथळे कमी करणे आणि महानगराच्‍या विविध भागांमधील अंतर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर प्रवासाच्या वेळेच्या दृष्टीनेही कमी करणे, हा आपल्या नियोजनाचा मुख्य उद्देश आहे. मुंबईचा विकास म्हणजे केवळ सिमेंट - काँक्रीटच्या रस्त्यांची निर्मिती नव्हे, तर मुंबईकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे होय, असेहीफडणवीस म्‍हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्‍हणाले की, मुंबईच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी नागरिकांचा अनावश्यक वेळ खर्च होऊ नये. वाहतूक कोंडीत अडकून राहण्याची वेळ येऊ नये. प्रत्येकाचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा झाला पाहिजे. महानगराच्‍या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचता यावे. मुंबईतील विविध भागांदरम्यान काही मिनिटांच्या आत प्रवास करता यावा, अशी संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले पाहिजे. विकासाचा खरा अर्थ ईज ऑफ लिव्‍हींग म्हणजे नागरिकांचे जीवन अधिक सोपे, सुलभ आणि सुखकर करणे, हा आहे. मुंबई महानगरपालिका या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने अत्यंत नियोजनबद्ध आणि चांगल्या पद्धतीने उड्डाणपूल प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल मी महानगरपालिकेचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे प्रकल्प केवळ वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे नाहीत, तर मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ करणे, त्यांचा वेळ वाचवणे आणि शहरातील कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, असेही मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्‍हणाले की, विद्याविहार, शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळील पूल आणि गोरेगाव येथील तिन्ही पुलांची वैशिष्ट्य म्हणजे ते मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाच्या अडथळ्यांवर उपाय देतानाच रस्ते आणि रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढविण्यासही हातभार लावतील. एका बाजूला रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, तर दुसऱ्या बाजूला लोकल रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा आणि संधी उपलब्ध होतील. मुंबईचा विकास करताना आपल्याला रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि शहरातील विविध भागांमधील कनेक्टिव्हिटी यांचा एकत्रित विचार करावा लागेल. या दृष्टीने आजचे हे तिन्ही पूल अत्यंत महत्त्वाचे आहेत. या प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होईल, वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत मिळेल आणि एकूण वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेतील सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो, असे मुख्‍यमंत्री फडनवीस यांनी सांगितले.

मुंबईच्‍या महापौर रितू तावडे अध्‍यक्षीय भाषणात म्‍हणाल्‍या की, लोकार्पण होत असलेले तीन उड्डाणपूल म्हणजे केवळ सिमेंट आणि लोखंडाचे प्रकल्प नाहीत, तर रोज वाहतूक कोंडीत धावणाऱ्या मुंबईकरांच्या आयुष्यातला मौल्यवान वेळ आहे. मुंबईत पैशांपेक्षाही माणसाच्या घामाचे आणि वेळेचे मूल्य जास्त आहे.

शीवचा ११२ वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल सुरक्षेसाठी बंद करावा लागला, तेव्हा अनेक अडचणी होत्या, लोकांच्या मनात चिंता होती. पण मध्य रेल्वे आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्‍यांनी अशी काही कमाल केली की, नियोजित वेळेच्या तब्बल चार महिने आधीच हा पूल पुन्हा दिमाखात उभा राहिला. विद्याविहारकरांना एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जायला अर्धा तास अडकावं लागायचं; तो प्रवास आता अवघ्या १० मिनिटांवर आला आहे. गोरेगाव - मुलुंड जोड रस्‍त्‍याच्‍या दिशेने पडलेले गतिमान पाऊल पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील अंतर कायमचे मिटवण्यासाठी सज्ज झाले आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिका केवळ रस्ते आणि उड्डाणपूल बांधत नाहीये, तर खऱ्या अर्थाने मुंबईकरांचं आयुष्य 'सुसह्य' करत आहे.

उपमहापौर संजय घाडी म्हणाले की, मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी उड्डाणपूल प्रकल्पाची आवश्यकता आहे. चांगले रस्ते, चांगले पूल हे मुंबईकरांना मिळायला पाहिजेत, असा ध्यास मुंबई महानगरपालिकेने अनेक वर्षांपासून घेतला. त्यातला हा एक नवीन टप्पा आहे. दहिसर ते मुंबई प्रवासात दररोज रहदारीचा सामना करावा लागतो. प्रवासात दोन तास जातात. आज हे तीन उड्डाणपूल आपल्या मुंबईकरांच्या सेवेसाठी समर्पित करताना आनंद होत आहे. पूलामुळे वेळेच्‍या बचतीसह इंधनाचीदेखील बचत होणार आहे.

महानगरपालिका आयुक्‍त अश्विनी भिडे प्रास्‍ताविकात म्‍हणाल्‍या की, शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव - मुलुंड मार्गावरील उड्डाणपूल या महत्त्वपूर्ण पूल प्रकल्पांमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा आणि गती मिळण्यास मदत होणार आहे. मुंबईसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या महानगरात वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवासाचा वेळ वाचवणे आणि नागरिकांना अधिक सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, हे मुंबई महानगरपालिकेचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >