Saturday, October 24, 2026

Bagulbuva : मराठी चित्रपटसृष्टीत AI चा नवा प्रयोग! ‘बागुलबुवा’चा टायटल टीझर प्रदर्शित; अभिजीत खांडकेकर मुख्य भूमिकेत

बागुलबुवा’ या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आली असून, या चित्रपटाचा टायटल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Entertainment News: आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI चा वापर आता मनोरंजन क्षेत्रातही वेगाने वाढत आहे. चित्रपट निर्मितीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग केले जात आहेत. आता मराठी चित्रपटसृष्टीतही असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला आहे. ‘बागुलबुवा’ या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आली असून, या चित्रपटाचा टायटल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या अनोख्या प्रयोगामुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ( Abhijeet Khandkekar)

AI तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष कलाकारांचा संगम

एस. एस. फिल्म्स प्रॉडक्शनच्या माध्यमातून ‘बागुलबुवा’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शरद पाटील आणि अंजली पाटील हे चित्रपटाचे निर्माते आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक चेतन चावडा यांनी चित्रपटाचे कथालेखन आणि दिग्दर्शन केले आहे, तर पटकथा लेखनाची जबाबदारी नितीन चव्हाण यांनी सांभाळली आहे.

विनोद राजे यांनी संकलन, अथर्व चव्हाण यांनी व्हीएफएक्स आणि आकाश पांडे यांनी स्टोरीबोर्डचे काम केले आहे. मेटाफेक्स प्रोडक्शनने चित्रपटाच्या AI संबंधित कामाची जबाबदारी सांभाळली आहे. आदिती द्रविड यांनी लिहिलेल्या गीतांना साई पियूष यांनी संगीत दिले आहे. ( Bagulbuva)

 

अभिनेता अभिजीत खांडकेकर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत आणखी 55 कलाकार या चित्रपटात असल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या नावांबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

‘बागुलबुवा’चे कथानक नेमके काय?

चित्रपटाच्या टायटल टीझरमध्ये पुणे आणि परिसरातील पार्श्वभूमी दिसते. अचानक उद्भवणारे संकट आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. या संकटाकडे पाहिल्यानंतर डोळ्यांवर परिणाम होतो, असा कथानकातील रहस्यमय संदर्भही टीझरमध्ये दिसत असल्याचे सांगितले जाते.

मात्र, हे संकट नेमके काय आहे, त्यामागचे कारण काय आणि ‘बागुलबुवा’ या नावाचा कथेशी काय संबंध आहे, याबाबत निर्मात्यांनी अधिक माहिती उघड केलेली नाही. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञानाचा नवा प्रयोग

AI तंत्रज्ञानामुळे चित्रपट निर्मितीतील दृश्ये, व्हीएफएक्स आणि कल्पनारम्य प्रसंग साकारण्याच्या पद्धतीत बदल होत आहेत. ‘बागुलबुवा’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतही या तंत्रज्ञानाचा वेगळ्या पद्धतीने वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

प्रत्यक्ष कलाकारांचा सहभाग आणि AI तंत्रज्ञानाची जोड हे या चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चित्रपटातील किती भाग AI च्या साहाय्याने तयार करण्यात आला आहे, याबाबतची सविस्तर माहिती समोर आल्यास या प्रयोगाचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल.

‘बागुलबुवा’च्या टायटल टीझरनंतर आता चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख, संपूर्ण कलाकारांची यादी आणि कथानकातील इतर महत्त्वाचे तपशील जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >