Saturday, October 24, 2026

Accident News: राजस्थानमध्ये नाशिकच्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, जखमींवर उपचार सुरू

या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणा परिसरात शोककळा पसरली आहे.

Nashik News: राजस्थानमधील जयपूर येथे नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या अपघातात सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील 4 भाविकांचा मृत्यू झाला असून, अन्य काही भाविक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणा परिसरात शोककळा पसरली आहे.

गिरीश महाजन यांचा राजस्थानच्या राज्यपालांशी संपर्क

अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मदतकार्याबाबत तातडीने पाठपुरावा केला. त्यांनी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली.

अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांचे शवविच्छेदन लवकरात लवकर पूर्ण करून त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्याची विनंती महाजन यांनी राज्यपालांकडे केली.

जखमींना योग्य उपचार देण्याची मागणी

अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाविकांना तातडीने जवळच्या योग्य रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर आवश्यक उपचार करावेत, तसेच सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही महाजन यांनी केली.

मंत्री महाजन यांच्या माहितीनुसार, राजस्थानच्या राज्यपाल कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जखमींना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या उपचारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सटाणा परिसरात शोककळा

राजस्थानमध्ये धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर ओढवलेल्या या संकटामुळे अजमेर सौंदाणे गावासह सटाणा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जखमी भाविक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली जात आहे.

अपघाताचे नेमके कारण, जखमींची संख्या आणि त्यांची प्रकृती याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील तपशील स्पष्ट होणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >