
उत्तराखंड : उत्तराखंडमधील केदारनाथ (Kedarnath) यात्रेदरम्यान एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून, हेलिकॉप्टरचे एका स्टेडियमवर सुखरूप खबरदारीची लँडिंग (Precautionary Landing) करण्यात आले. या हेलिकॉप्टरमधून मुंबईतील पाच प्रवासी प्रवास करत होते. विशेष म्हणजे, या घटनेत सर्व सहा जण (पाच प्रवासी आणि एक पायलट) पूर्णपणे सुखरूप असून, कोणालाही दुखापत झालेली नाही.
सकाळच्या सुमारास घडली घटना
A helicopter flying from Dehradun to Kedarnath made an emergency landing at Bauradi Stadium in New Tehri today after developing a technical fault. Six passengers were on board, and all are safe.
After the fault was fixed, the helicopter took off again for Kedarnath a little later. — Kumaon Jagran (@KumaonJagran) October 24, 2026
शनिवारी (२४ ऑक्टोबर २०२६) सकाळी ७ ते ७:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 'ट्रान्स भारत एव्हिएशन' (Trans Bharat Aviation) कंपनीचे हे हेलिकॉप्टर देहरादूनमधील सहस्रधारा हेलिपॅडवरून गुप्तकाशी आणि केदारनाथच्या दिशेने निघाले होते. वाटेत असताना अचानक हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून पायलटला तातडीने हेलिकॉप्टर खाली उतरवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
स्टेडियमवर हेलिकॉप्टर उतरल्याने उडाली होती भीती
न्यू टिहरी येथील बौराडी (Bauradi) स्टेडियमवर हे हेलिकॉप्टर अचानक खाली उतरल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नेहमीप्रमाणे स्टेडियमवर सकाळी फिरायला गेलेले नागरिक आणि खेळत असलेली मुले हेलिकॉप्टर खाली उतरताना पाहून गोंधळून सुरक्षित ठिकाणी पळाले. मात्र, पायलटच्या कुशलतेमुळे लँडिंग अत्यंत सुरक्षितपणे पार पडले. या घटनेत जमिनीवर किंवा हवेत कोणतीही हानी झाली नाही, ज्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
तांत्रिक बिघाडानंतर योग्य निर्णय
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या (टेक्निकल फॉल्ट किंवा वॉर्निंग लाईट) निर्माण झाली होती. उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशन डेव्हलपमेंट अथॉरिटीचे (UCADA) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक जैन आणि पायलटने दुजोरा दिला की, हा बिघाड लक्षात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ही लँडिंग करण्यात आली होती. सर्व प्रवासी सुरक्षित असून यंत्रणा सतर्क झाली होती.
तपासणीनंतर हेलिकॉप्टर पुन्हा केदारनाथकडे रवाना
स्टेडियमवर हेलिकॉप्टर सुरक्षित उतरल्यानंतर पायलटने फोनवरून संबंधित तंत्रज्ञांशी संपर्क साधून तांत्रिक अडचणीची माहिती घेतली आणि आवश्यक ती पाहणी व दुरुस्ती केली. साधारण ३० ते ३५ मिनिटांनंतर हेलिकॉप्टरमधील बिघाड दूर करण्यात आला. त्यानंतर हे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा स्टेडियमवरून उड्डाण करून गुप्तकाशी आणि केदारनाथच्या दिशेने मार्गस्थ झाले. प्रवासादरम्यान यानंतर कोणतीही अडचण किंवा समस्या आली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.






