नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची औपचारिक सुरुवात ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहणाने होणार आहे. या ध्वजारोहणासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राज्याच्या शिष्टमंडळाने आमंत्रण दिले. ३१ ऑक्टोबरचे ध्वजारोहण राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पार पडणार असून १२ वर्षांनी नाशिकमध्ये होणारा हा कुंभमेळा नाशिककरांसाठी आणि राज्यातील भाविकांसाठी एक मोलाचा क्षण ठरणार आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ३१ ऑक्टोबरचे नियोजन आणि कुंभमेळ्यासाठी सुरु असलेली तयारी याबद्दल माहिती दिली. कुंभमेळ्याची सुरुवात ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी राष्ट्रपतींच्या हस्ते नाशिकमध्ये, तर त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या तयारीबद्दल बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, '' भगवा ध्वज हा राज्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. बारा वर्षांनंतर कुंभमेळा होत आहे. संपूर्ण नाशिक शहरात कुंभमेळ्याची तयारी सुरू असून कामे वेगाने सुरू आहेत. २०२७ मध्ये कुंभमेळा होणार असल्याने त्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे." कुंभमेळ्याच्या वातावरणनिर्मितीसाठी ३१ ऑक्टोबरपूर्वी सहा दिवसांचे ‘हर घर भगवा’ अभियान हाती घेण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. ''नाशिकमध्ये असे एकही घर राहणार नाही, जिथे भगवा ध्वज लावलेला नसेल. शहरात सर्वत्र भगवे ध्वज लावण्यात येणार आहेत. यंदा कुंभमेळ्यात १२ कोटींपेक्षा जास्त भाविक येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाविकांची संख्या चारपट वाढण्याची शक्यता असून हे आमच्यासमोर मोठे आव्हान आहे.'' असे देखील कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्या, रविवार (दि. २५ ऑक्टोबर) कोजागरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर ...
''अनेक वर्षांपासून शैव आणि वैष्णव आखाड्यांमध्ये मतभेद होते. मात्र, यावेळी सर्वांनी एकत्र येण्यास सहमती दर्शवली आहे. तुम्ही आमच्याकडे या आणि आम्ही तुमच्याकडे येऊ, अशी भूमिका घेण्यात आली आहे. हा दुग्धशर्करा योग आहे. एकत्र येण्याची सुरुवात नाशिकपासून होत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक आखाडे आहेत. तेही नाशिकमध्ये येतील. यामुळे आगळेवेगळे मनोमिलन घडेल.'' अशी भावना मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.