झाशी : उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका नवविवाहित महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुस्कान सिमोलिया (वय २८) ही पती निलेशसोबत हॉटेलमध्ये गेली होती. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये खोलीच्या दरवाजाजवळ प्रवेश केल्यानंतर अवघ्या पाच सेकंदांत मुस्कान अचानक मागे कोसळल्याचे दिसत आहे. त्यानंतर पतीने तिला उचलून खोलीच्या आत नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर मुस्कानच्या वडिलांनी तिच्या पतीवर हत्येचा आरोप केला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
नेमकं त्या पाच सेकंदांत काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, मुस्कान आणि तिचा पती निलेश शुक्रवारी रात्री झाशीतील सिपरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलमधून बाहेर पडण्याच्या तयारीदरम्यान मुस्कान अचानक कोसळल्याचे निलेशने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुस्कान पती आणि हॉटेलमधील अन्य एका कर्मचाऱ्यासोबत खोलीत प्रवेश करताना दिसते.
काही क्षणांतच ती दरवाजाजवळ मागच्या बाजूला कोसळते. तिचे डोके जमिनीवर आदळल्याचेही फुटेजमध्ये दिसत आहे. यानंतर निलेश तिला उचलून खोलीच्या आत घेऊन जातो. मात्र, मुस्कान नेमकी कशामुळे कोसळली, तिला काही दुखापत झाली होती का किंवा तिच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
Jhansi: हॉटेलच्या खोलीत पाऊल टाकताच नववधू ५ सेकंदांत कोसळली, हत्येचा आरोप
.
.
#Jhansi #CCTV #Prahaarnewsline #marathinews #Utterpradesh https://t.co/gFEjDGLWLz
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) October 26, 2026
वडिलांचा पतीवर गंभीर आरोप
मुस्कानचे वडील रामजी लाल अहिरवार यांनी मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. मुस्कानच्या डोक्यावर जखमा असल्याचा दावा करत त्यांनी तिच्यावर मारहाण झाल्याची शक्यता व्यक्त केली आणि पतीवर हत्येचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पोलिसांनी निलेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, घटनेच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत.
पहिल्या लग्नाची माहिती लपवल्याचा आरोप
मुस्कानचा विवाह २९ जून रोजी निलेशसोबत झाला होता, असे तिच्या वडिलांनी सांगितले. निलेश हा मध्य प्रदेशातील विदिशा येथील रहिवासी असून, तो बँकेत व्यवस्थापक असल्याचे वृत्त आहे.मुस्कानच्या वडिलांच्या आरोपानुसार, निलेशचे यापूर्वीही लग्न झाले होते आणि त्याची पहिली पत्नी इंदूर येथे राहत असल्याची माहिती नंतर कुटुंबीयांना मिळाली. या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मुस्कानच्या मृत्यूमागे वैवाहिक वाद कारणीभूत आहेत का, याचाही तपासातून उलगडा होणे अपेक्षित आहे.
रेल्वेच्या परीक्षेच्या तयारीसाठी आली होती माहेरी
मुस्कान १० ऑक्टोबर रोजी झाशी येथील आपल्या माहेरी आली होती. २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रेल्वे कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) परीक्षेची तयारी करण्यासाठी ती माहेरी परतल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. वडिलांच्या म्हणण्यानुसार, २३ ऑक्टोबर रोजी निलेश झाशी येथे आला आणि मावशीकडे जाण्याचे कारण सांगून मुस्कानला सोबत घेऊन गेला. मात्र, त्याने तिला हॉटेलमध्ये नेल्याचा आरोप अहिरवार यांनी केला आहे.यानंतर हॉटेलमध्ये नेमके काय घडले आणि मुस्कानच्या मृत्यूचे कारण काय, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष
या प्रकरणात पोलिसांनी हॉटेलची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. मुस्कानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालातून मृत्यूचे संभाव्य कारण आणि जखमांचे स्वरूप स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. सध्या पोलिसांकडून निलेशची चौकशी सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे घटनाक्रमाची पडताळणी केली जात आहे.
मुस्कानचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिच्या डोक्यावरील जखमांचा मृत्यूशी संबंध आहे का आणि या प्रकरणात कोणाची भूमिका आहे, या प्रश्नांची उत्तरे शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच स्पष्ट होतील.