नमित मल्होत्रा यांच्या 'रामायण' चित्रपटातील सीतेची भूमिका साकरणारी अभिनेत्री साई पल्लवी अलीकडेच एका टॉक शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने डॉक्टर ते अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास, चित्रपटांची निवड, मित्र आणि कुटुंब यांबद्दल या अभिनेत्रीने तिच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच तिने हनुमान चालिसा शिकण्याची प्रेरणा कशातून मिळाली हे उघड केले. अभिनेत्री साई रोज हनुमान चालिसा न चुकता म्हणते असेदेखील तिने सांगितले.
या कार्यक्रमात साई पल्लवीने सांगितले की, काही वर्षांपूर्वी ती, तिची बहीण पूजा कन्नन आणि मैत्रिणीसोबत कसोलला गेली होती. एकदिवशी त्यांनी पार्वती व्हॅलीला भेट देण्याचे ठरवले. असे मानले जाते की, पार्वती नदीत स्नान करत असताना देवी पार्वतीने आपले एक अनमोल रत्न गमावले. क्रोधित झालेल्या भगवान शिवाने आपला तिसरा डोळा उघडला आणि सर्पदेव शेषाने फुत्कार सोडला. ज्यामुळे पृथ्वीतून उकळते पाणी उसळून आले आणि ते रत्न पुन्हा पृष्ठभागावर आले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, भगवान शिवाने त्या खोऱ्यात हजारो वर्षे तपश्चर्या केली आणि आपल्या पत्नी पार्वतीच्या नावावरून त्या खोऱ्याला नाव दिले, जिने स्वतःही तिथेच तपश्चर्या केली होती. अशा आख्यायिका या व्हॅलीबद्दल सांगितल्या जातात. (टीप : ही माहिती आख्यायिकांमधील आहे.)
Cristiano Ronaldo: जागतिक फुटबॉल विश्वातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या प्रचंड आणि अभूतपूर्व मतदानानंतर, ...
साई पल्लवीने तिचा अनुभव सांगताना सांगितले की, ती तिच्या मैत्रिणी आणि बहिणीसोबत दरी फिरायला निघाली, पण तिला हे माहीत नव्हतं की शेवटची बस संध्याकाळी 5 च्या सुमारास सुटते. 'आम्ही परत येण्यापूर्वी शेवटची बस निघून गेली होती. त्यामुळे आम्हाला तो संपूर्ण रस्ता उतारावरून चालत जावे लागले. चांदण्याने आमचा मार्ग उजळला होता. डावीकडे घनदाट जंगल होते. अंधार होता आणि अचानक कुठूनतरी एक कुत्र्याचे पिल्लू आमच्याकडे चालत आले.' असे तिने सांगितले.
साईने सांगितले की, त्यांच्या प्रवासाच्या शेवटपर्यंत तो कुत्रा त्यांच्यासोबत चालत होता. तिच्या बहिणीला हनुमान चालिसा येत होती आणि तिने तिचे पठण सुरू केले. 'माझ्या आयुष्यात पाहिल्यांदाच मला वाटलं की हे मला कसं माहीत नाही? मला हे शिकायलाच हवं.' असं अभिनेत्रीने सांगितलं. तिच्या बहिणीने हनुमान चालिसेच्या सुरुवातीच्या ओळी जेमतेम संपवल्या होत्या, तेवढ्यात तो कुत्रा कुठूनतरी अचानक आला आणि दुकानाच्या रांगेजवळील दिव्यांपर्यंत त्यांना घेऊन गेला. ' जेव्हा आम्ही त्या दुकानांजवळ पोहोचलो, तेव्हा ते कुत्र्याचे पिल्लू मागे वळून निघून गेले. मला वाटते की, देवच एका लहान पिल्लाच्या रूपात आमच्यासोबत चालत होता. त्या दिवसापासून मी हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. मी दररोज किमान एकदा तरी हनुमान चालिसा पठण करते.' असे साई पल्लवी कार्यक्रमादरम्यान म्हणाली.