Cyclone Murasu : ‘अर्नब’ चक्रीवादळा'नंतर आता मुरासू चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे. यापूर्वीच्या चक्रीवादळानंतर आता ‘मुरासू’ नावाचे नवे चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यासंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे.
समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून, हे वादळ वेगाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. मंगळवारपर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारताने सुचवले 'मुरासू' नाव; काय आहे अर्थ ?
‘मुरासू’ हे नाव भारताने सुचवले असून, त्याला तमिळ संस्कृती आणि इतिहासाची पार्श्वभूमी आहे. तमिळ भाषेतील ‘मुरासू’ या शब्दाचा अर्थ ढोल किंवा प्राचीन तालवाद्य असा होतो. पूर्वीच्या काळात राजे-महाराजांच्या शासनात या ढोलाचा वापर महत्त्वाच्या घोषणा, राजसंदेश तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा संकटाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जात असे. संकटाची पूर्वसूचना देण्याशी संबंधित असलेल्या या ऐतिहासिक परंपरेतूनच भारताने चक्रीवादळाला ‘मुरासू’ हे नाव सुचवले आहे.
Maharashtra Weather: राज्यातील हवामानात पुन्हा बदल झाला असून, नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी अपेक्षित थंडी अद्याप जाणवत नाही. काही भागांत उष्ण आणि कोरडे हवामान आहे, ...
किती धोकादायक ठरू शकते मुरासू ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे किनारपट्टीच्या भागांत ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळ पुढे सरकत असताना वाऱ्यांच्या झोतांचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे किनारपट्टीच्या भागांत सतर्कता बाळगण्याची गरज आहे.
मात्र, उपलब्ध अंदाजानुसार मुरासू चक्रीवादळाची तीव्रता यापूर्वीच्या ‘अर्नब’ चक्रीवादळापेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्नब चक्रीवादळादरम्यान आंध्र प्रदेशात ताशी सुमारे १३० किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे मुरासूच्या संभाव्य परिणामांवर हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे लक्ष आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील नागरिकांनी हवामान विभाग आणि प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.