Wednesday, November 4, 2026

Dhanteras: धनत्रयोदशी म्हणजे काय? त्यामागील कथा तुम्हाला माहित आहे का?

या दिवसाला धनत्रयोदशी, धनतेरस, आणि धन्वंतरी त्रयोदशी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.पण, या सणामागील पौराणिक कथा तुम्हाला माहित आहे का? विविध प्रथांसोबत त्याचा संबंध काय? या दिवशी भांडी आणि सोने खरेदी करणे शुभ का मानले जाते? तसेच यमदीपदान करण्यामागील कारण काय?

Dhanteras Katha: दिवाळी सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची विशेष पूजा केली जाते. तसेच मुख्यतः यादिवशी सोने, चांदी आणि नवीन भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवसाला धनत्रयोदशी, धनतेरस, आणि धन्वंतरी त्रयोदशी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.पण, या सणामागील पौराणिक कथा तुम्हाला माहित आहे का? विविध प्रथांसोबत त्याचा संबंध काय? या दिवशी भांडी आणि सोने खरेदी करणे शुभ का मानले जाते? तसेच यमदीपदान करण्यामागील कारण काय?

दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि भांडी इत्यादी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. यामुळे संपत्तीचा देव कुबेर प्रसन्न होतो आणि आपल्यावर धनाचा वर्षाव होतो, असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार, कार्तिक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे या तिथीला धनत्रयोदशी या नावाने ओळखले जाते. म्हणूनच या तिथीला भांडी खरेदी करण्याची परंपरा चालत आलेली आहे.

तसेच यामागील अजून एक पौराणिक कथा म्हणजे, राजा हिम यांच्या मुलाची कथा. ज्योतिषांनी भविष्यवाणी केली होती की, राजा हिम यांच्या राजपुत्राच्या जन्मानंतर त्याचा विवाह झाल्यानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू होईल. या भविष्यवाणीची राजपुत्राच्या पत्नीला आधीच माहिती होती. त्यामुळे पतीचे प्राण वाचवण्यासाठी तिने एक युक्ती केली. विवाहानंतरच्या चौथ्या दिवशी तिने राजपुत्राला झोपूच दिले नाही. रात्री त्याच्या शयनकक्षाच्या प्रवेशद्वारावर सोन्या-चांदीची नाणी आणि दागिने यांचा ढीग रचला. संपूर्ण घरात आणि अंगणात असंख्य दिवे लावले. त्यामुळे घराचा परिसर प्रकाशाने उजळून निघाला व पतीला जागे ठेवण्यासाठी रात्रभर त्याला गोष्टी सांगत राहिली, गाणी गात राहिली. राजपुत्राचे प्राण घेण्यासाठी यमराज सर्पाचे रूप धारण करून आले होते. मात्र, प्रवेशद्वारावरील दिव्यांचा लखलखाट आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ढीग पाहून ते थांबले. त्यांना आत जाण्याचा मार्ग मिळाला नाही. दागिन्यांच्या ढिगावर बसून राजपुत्राच्या पत्नीने गायलेली गाणी ऐकत राहिले. पहाट होताच यमराज राजपुत्राचे प्राण न घेता तेथून निघून गेले. अशा प्रकारे पत्नीच्या चातुर्यामुळे राजपुत्राचे प्राण वाचले, अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाच्या नावाने दिवा लावण्याची परंपरा सुरू झाली. या विधीला 'यमदीपदान' असेही म्हणतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >