Nashik : दिंडोरी तालुक्यातील गणोरवाडी येथे सहा अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तलवार, लोखंडी कोयता आणि छऱ्यांच्या बंदुकीसारखी शस्त्रे घेऊन आलेल्या दरोडेखोरांनी दाम्पत्याला ओलीस धरत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि दुचाकी असा एकूण ७ लाख १० हजार २५० रुपयांचा ऐवज लुटला. दरोड्यानंतर दाम्पत्याला खोलीत कोंडून आरोपी फरार झाले. या घटनेमुळे गणोरवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शस्त्रांचा धाक दाखवून घरात प्रवेश
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी रात्री ७.४५ ते १० वाजेदरम्यान गणोरवाडी येथील शेतगट क्रमांक ६४ मध्ये ही घटना घडली. संजय भास्कर पिंगळ (वय ५९) हे पत्नी निर्मला यांच्यासह घरी असताना सहा अज्ञात दरोडेखोर त्यांच्या घरासमोर आले. आरोपींपैकी चौघांनी संजय पिंगळ यांना, तर दोघांनी त्यांच्या पत्नीला पकडले. त्यानंतर तलवार, चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून दाम्पत्याला ओलीस ठेवण्यात आले. आरोपींनी घरात प्रवेश करून कपाट, शोकेस आणि पलंगासह घरातील विविध ठिकाणी ठेवलेला ऐवज लुटला. दाम्पत्याच्या अंगावरील दागिनेही जबरीने काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सोन्याचे दागिने, रोकड आणि दुचाकी लंपास
या दरोड्यात आरोपींनी अंदाजे ५ लाख रुपये किमतीचे ११.५ तोळे सोन्याचे दागिने, ३५ हजार २५० रुपये किमतीचे चांदीचे दागिने, १ लाख ३० हजार रुपयांची रोकड आणि ४५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल लुटली.विशेष म्हणजे, घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआरदेखील आरोपींनी सोबत नेले. त्यामुळे दरोडेखोरांनी घरातील ऐवजासह महत्त्वाचे पुरावेही घेऊन पोबारा केला. या घटनेत एकूण ७ लाख १० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
नाशिक : सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई ...
दाम्पत्याला खोलीत कोंडून आरोपी फरार
दरोडा टाकल्यानंतर आरोपींनी संजय पिंगळ आणि त्यांच्या पत्नीला घरातील एका खोलीत बंद करून बाहेरून कडी लावली. त्यामुळे दाम्पत्याला तातडीने बाहेर पडता आले नाही.मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) सकाळी त्यांची सुटका झाल्यानंतर चोरीस गेलेल्या वस्तूंची खात्री करण्यात आली. त्यानंतर चोरी झालेल्या ऐवजाची यादी तयार करून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
दिंडोरी पोलिसांकडून तपास सुरू
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करण्यात आली असून ई-साक्ष प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.या प्रकरणात अद्याप कोणताही चोरीचा मुद्देमाल हस्तगत झालेला नाही. तसेच सहाही आरोपींची ओळख पटलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
वृद्ध दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा पडल्याच्या घटनेमुळे गणोरवाडीसह आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी घरात घुसून दरोडा टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२), ३१२, ३३१(६), १२७(२) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बी. एच. मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे.