Thursday, November 5, 2026

Nashik : नाशिकमध्ये 'या' पाच मिठाई उत्पादकांचे परवाने निलंबित, अस्वच्छता आणि झुरळांचा प्रादुर्भाव उघड

तपासणीदरम्यान काही आस्थापनांमध्ये मिठाई तयार करण्याच्या जागेत अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि अन्न सुरक्षा व मानके नियमांतील अनुसूची चारच्या तरतुदींचे गंभीर उल्लंघन आढळून आले.

नाशिक : सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई केली आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील पाच मिठाई उत्पादक आस्थापनांमध्ये तपासणीदरम्यान अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले. यामुळे संबंधित आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून, या कारवाईमुळे मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने तसेच सहायक आयुक्त विनोद धवड, संदीप देवरे आणि दिनेश तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरासह जिल्ह्यातील मिठाई उत्पादक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काही आस्थापनांमध्ये मिठाई तयार करण्याच्या जागेत अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि अन्न सुरक्षा व मानके नियमांतील अनुसूची चारच्या तरतुदींचे गंभीर उल्लंघन आढळून आले. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याने प्रशासनाने संबंधित आस्थापनांविरोधात थेट परवाना निलंबनाची कारवाई केली.

या पाच मिठाई आस्थापनांवर कारवाई

परवाने निलंबित करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये देवळाली कॅम्प येथील मे. सिर्वी स्वीट्स, अशोका मार्गावरील मे. कृष्णा सागर स्वीट्स, तिडके कॉलनीतील मे. पंचम स्वीट्स, ओझर बसस्थानकाजवळील मे. साई बिकानेर स्वीट्स आणि भगूर येथील मे. उत्तम फरसाण अँड स्वीट्स यांचा समावेश आहे.

सणासुदीत मिठाईच्या स्वच्छतेवर प्रशासनाचा भर

दिवाळीसह विविध सणांच्या काळात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत मिठाई तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळणे ही ग्राहकांच्या आरोग्यासाठी चिंताजनक बाब आहे.अन्नपदार्थ तयार करताना आणि हाताळताना स्वच्छता राखणे, उत्पादन परिसर कीटकमुक्त ठेवणे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे पालन करणे प्रत्येक व्यावसायिकासाठी बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई

ही तपासणी आणि कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक, अश्विनी पाटील, प्रतीक भड आणि ऋतुजा नवले यांच्या पथकाने केली.नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांची नियमित तपासणी करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन

मिठाई किंवा अन्य अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांनी आवश्यक परवाने घेऊनच व्यवसाय करावा तसेच उत्पादन आणि विक्रीदरम्यान स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार मिठाई मिळावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >