
मुंबई ( विशेष प्रतिनिधी)
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन बुधवारी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात भरविण्यात आले. मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या जुन्या इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर आयोजित या प्रदर्शनाला महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे,अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा आणि संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी भेट देऊन वस्तूंची खरेदी केली.
महानगरपालिका मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासोबतच महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्येही दिवाळीनिमित्त प्रदर्शन-विक्रीचे स्टॉल लावण्यात आले. या ठिकाणीही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासह गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले जाते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महिला व बालकल्याण योजना तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना–राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या सणानिमित्त आयोजित या प्रदर्शनामुळे महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली.
या प्रदर्शनात उटणे, अगरबत्ती, ज्यूट बॅग्ज, इमिटेशन ज्वेलरी, मोत्यांचे दागिने, रांगोळी, सुवासिक द्रव्ये, सुशोभित पणत्या, विविध प्रकारची आकर्षक तोरणे, आकाशकंदील आदी सजावटीच्या वस्तूंसह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी मांडण्यात आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने व स्वहस्ते तयार केलेल्या सुंदर आणि नाविन्यपूर्ण वस्तूही या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी त्यांना या प्रदर्शनात समावून घेण्यात आले.






