
पंजाब : पंजाबमधील राजपुरा परिसरात कर्मभूमी एक्स्प्रेसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सराय बंजारा आणि बसंतपुरा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या ट्रेनच्या चार डब्यांना आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. डब्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागल्याने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी तातडीने ट्रेनमधून खाली उतरण्यास सुरुवात केली. सुदैवाने, लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे ट्रेन वेळेत थांबवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.
दुपारी १.१० वाजता आगीची घटना
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमृतसरहून न्यू जलपाईगुडीकडे जाणाऱ्या १२५०८ क्रमांकाच्या कर्मभूमी एक्स्प्रेसमध्ये दुपारी सुमारे १ वाजून १० मिनिटांनी आग लागली. राजपुरापासून अंदाजे १५ किलोमीटर अंतरावर बसंतपुरा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. ट्रेनच्या इंजिनाकडून पाचव्या डब्यात आग लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आग इतर डब्यांपर्यंत पसरल्याने एकूण चार डबे आगीच्या तडाख्यात सापडल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ट्रेन तातडीने थांबवण्यात आली.
View this post on Instagram
लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
ट्रेनला आग लागल्याचे लक्षात येताच लोको पायलटने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. त्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची कार्यवाही केली. डब्यांमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे पाहून प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती आहे.
टेक्नोलॉजीच्या जगात भारताने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारत सरकारने तीन नवीन स्वदेशी AI मॉडेल लॉन्च केले आहेत. EKA-1, Dhir 2B आणि Dhir 5B अशी या तीन AI मॉडेलची नावे ...
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. दूरवरूनही धुराचे ढग दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
जीवितहानीबाबत दिलासादायक माहिती
या घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची सुरुवातीला माहिती समोर आली होती. मात्र, उपलब्ध नंतरच्या माहितीनुसार कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. आगीमुळे रेल्वेचे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून घटनेची चौकशी केली जात असून आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील समोर येण्याची प्रतीक्षा आहे. लोको पायलटने वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.






