कस्टम अधिकारी बनून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लुटणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश; मुंबईत 3 जण गजाआड!

मुंबई पोलिसांनी बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्नात असलेल्या तीन बनावट कस्टम अधिकाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्वतःला डीआरआय (DRI) आणि कस्टम अधिकारी सांगून प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या या भामट्यांना मुंबई पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवला आहे.

मुंबई: परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांना गाठून, बनावट ओळखपत्रांच्या आधारे त्यांची लुटमार करणाऱ्या एका भामट्यांच्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्वतःला 'कस्टम्स' आणि 'डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स' (DRI) चे उच्च अधिकारी सांगून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना धमकावणाऱ्या आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे.


अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद झोहेब उस्मान बलोच (मुंबई, अंधेरी पश्चिम), झैद नदीम शेख (मुंबई, मालाड पश्चिम) आणि सालिया सईद अहमद कुरेशी (मुंबई, मालाड पश्चिम) अशी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे तिघेही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मोहम्मद बलोच डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो, झैद शेख कॉल सेंटरमध्ये काम करतो, तर सालिया कुरेशी टिफिन सर्व्हिसचं काम करतो. मात्र, कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याच्या हाव्यासापोटी या तिघांनी थेट केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. तिघांनीही रचलेला हा बनाव त्यांच्या चांगलाच अंगलट आलेला आहे.



असा उघडकीस आला बनावट अधिकाऱ्यांचा कारनामा


ही संपूर्ण घटना शुक्रवारी घडली. मुंब्रा येथील रहिवासी अमान हसन मिर्झा हे बँकॉकहून विमान प्रवासाने मुंबईत दाखल झाले. ते विमानतळाबाहेर पडताच या तिघांनी त्यांना अचानक गाठले. स्वतःला कस्टम अधिकारी सांगत, एका आरोपीने मिर्झा यांच्या कॉलरला हात घातला आणि धक्काबुक्की करत त्यांचा पासपोर्ट आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. तुमच्या बॅगेत प्रतिबंधित (Prohibited) वस्तू आहेत, असा आरोप करत त्यांनी सामानाची तपासणी करण्याचा धाक दाखवला. त्यानंतर अमान मिर्झा यांना जबरदस्तीने विमानतळाच्या पार्किंग परिसरामध्ये नेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, त्याच वेळी तेथील वाहतूक पोलिसांचे (Traffic Official) या झटापटीकडे लक्ष गेले. पोलिसांनी तात्काळ तिथे पोहोचून मध्यस्ती केली आणि आरोपींची चौकशी सुरू केली. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींची बोबडी वळली आणि त्यांचा बनाव उघड झाला.



अशी होती गुन्ह्याची पद्धत


चौकशीदरम्यान आरोपींनी पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केले. विमानतळाबाहेर येणाऱ्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवाशाला सहज आपला 'बळीचा बकरा' बनवण्याचा ह्या तिघांचा प्रयत्न असायचा. प्रवाशांकडे नवीन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा कोणतेही अतिरिक्त सामान दिसल्यास, दंड भरण्याच्या नावाखाली ते प्रवाशांकडून मोठे रक्कमेची मागणी करत आणि पैसे न दिल्यास कारवाईची धमकी द्यायचे. प्रवाशांना घाबरवून त्यांच्याकडून रोकड आणि मौल्यवान वस्तू उकळणे हा या टोळीचा मुख्य उद्देश होता.



तपास सुरू


मुंबई पोलीसांकडून सध्या ह्या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. या टोळीने आतापर्यंत अशा प्रकारे किती प्रवाशांना धमकावून पैसे उकळले आहेत? हा बनावट प्रकार ते किती महिन्यांपासून करत होते? आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये विमानतळावरील इतर कोणत्या कर्मचाऱ्याचा सहभाग आहे का? या सर्व बाबींचा मुंबई पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या कारवाईमुळे विमानतळ परिसरात बनावट अधिकारी बनून लुटणाऱ्या गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Fire: परळच्या कामगार स्टेडियममध्ये भीषण आग, लाकूड आणि बांबूच्या साहित्याला आग; जीवितहानी नाही

मुंबई: मुंबईतील दादर पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील प्रसिद्ध कामगार स्टेडियममध्ये रविवारी

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

महाराष्ट्रात 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती; ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बळकटी

मुंबई: महाराष्ट्र सरकारने जनतेला उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचे आश्वासन

मुंबई: राज्यात फळबागा असलेल्या एकूण 6 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सुमारे 2.5 लाख

मुंबई- बेंगळुरू प्रवास आता सुस्साट, 988 Km चं अंतर फक्त 16 तासांत पूर्ण करता येणार

मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री- एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय ग्राहक व्यवहार- प्रल्हाद जोशी, अन्न

Mumbai News: क्रॉफर्ड मार्केटच्या ऐतिहासिक वास्तूचे आणि वारसा स्थळाचे महत्त्व जपा! महापौर रितू तावडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक व जागतिक