Leopard News : चार दिवस उलटूनही नगरमधील बिबट्या मोकाट

शेंडी परिसरातील बिबट्या जेरबंद; शहरातील बिबट्याचा शोध सुरूच करण्यात वन विभागाला यश

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शहरातील दाट लोकवस्तीच्या भागासह प्रमुख शासकीय कार्यालयांच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मुक्तपणे वावरत असलेल्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत असून, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर केला जात आहे. मात्र, तीन दिवस उलटूनही शासकीय कार्यालयांच्या परिसरात वावरणारा बिबट्या अद्याप वनविभागाच्या हाती लागलेला नाही. ( Leopard News)


दरम्यान, शहरालगतच्या शेंडी, पोखर्डी आणि पिंपळगाव उज्जैनी परिसरात वावरणाऱ्या दुसऱ्या बिबट्याला काल सायंकाळी पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.


गेल्या तीन दिवसांपासून अहिल्यानगर शहरातील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्तीच्या भागात तसेच महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत असल्याने नागरिकांसह शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाच्या पथकाकडून ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिसरावर लक्ष ठेवले जात आहे. तसेच संभाव्य मार्गांवर पिंजरे लावून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि वनविभागाच्या पथकाची मदत घेऊन शोधमोहीम सुरू असली, तरी अद्याप या बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही.


दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या शेंडी, पोखर्डी आणि पिंपळगाव उज्जैनी परिसरातही बिबट्याचा वावर असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या माहितीची गंभीर दखल घेत वनविभागाच्या पथकाने संबंधित परिसरात पाहणी करून शोधमोहीम सुरू केली होती. सुरुवातीला शहरातील शासकीय कार्यालयांच्या परिसरात आणि शेंडी-पिंपळगाव परिसरात दिसणारा बिबट्या एकच असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, दोन्ही भागांतील बिबट्याच्या हालचालींच्या वेळा आणि भौगोलिक अंतर लक्षात घेता हे दोन वेगवेगळे बिबटे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानुसार वनविभागाने शेंडी, पोखर्डी आणि पिंपळगाव उज्जैनी परिसरात पिंजरे लावले होते. अखेर काल सायंकाळी यापैकी एका पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.






मात्र, शहरातील शासकीय कार्यालयांच्या परिसरात वावरणारा दुसरा बिबट्या अद्याप मोकाट असल्याने वनविभागासमोर त्याला पकडण्याचे मोठे आव्हान कायम आहे. यासंदर्भात वनविभागाचे अधिकारी तेलोरे यांनी माहिती देताना सांगितले की, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. कार्यालयांच्या नजीकच्या परिसरात पिंजरे लावण्यात आले असून, बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. लवकरच या बिबट्यालाही जेरबंद करण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


दरम्यान, नागरिकांनी बिबट्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावरील अप्रमाणित व्हिडिओ आणि संदेश पुढे पाठवू नयेत तसेच घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. एक बिबट्या जेरबंद झाल्याने शेंडी, पोखर्डी आणि पिंपळगाव उज्जैनी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अहिल्यानगर शहरातील शासकीय कार्यालयांच्या परिसरात वावरणारा दुसरा बिबट्या कधी जेरबंद होणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Illegal Sand Mining : नागपूर-वाळू माफियांवर ईडीची मोठी कारवाई; 16.23 कोटींची मालमत्ता जप्त, बनावट ई-टीपीद्वारे कोट्यवधींचा व्यवहार

Nagpur News: नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांमधील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे.

Mumbai Tunnel Project : मुंबईच्या वाहतूक कोंडीवर ‘पाताळ लोक’चा उतारा!

मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी आता जमिनीखालून रस्त्यांचे जाळे

Toilet Repair Campaign : गावोगावी शौचालयांची होणार पोलखोल, नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सरसावली; १० डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : गावोगावी स्वच्छतेचा गाजावाजा होत असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शौचालयांची दुरवस्था

ऑनलाइन बेटिंगच्या कर्जापायी वृद्धेची निर्घृण हत्या! गोव्यात मौजमजा करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी कसे पकडले?

रायगड : ऑनलाइन बेटिंग आणि ट्रेडिंगच्या व्यसनामुळे मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या 21 वर्षीय तरुणाने

Dr. Vikhe Patil : मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्यास गप्प बसणार नाही, रोहित पवारांच्या आरोपांना डॉ. विखे पाटील यांचे प्रत्युत्तर; तीन सवाल केले उपस्थित

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी तालुक्यांत अनावश्यक बांधकामांना स्थगिती

मुंबई : राज्यातील ३१० दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी