Friday, November 20, 2026

Crime News : प्रेमजाळ्यात ओढलं, लग्नाचं स्वप्न दाखवलं अन् 13 महिलांना लुटलं,आरोपी UAE मधून ताब्यात

20 नोव्हेंबर 2026 रोजी त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांना एका प्रकरणात त्याचा शोध होता.

नवी दिल्ली : लग्नाचे आमिष दाखवून महिलांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या मोहम्मद माझिन याला संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) भारतात आणण्यात आले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र पोलिसांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. 20 नोव्हेंबर 2026 रोजी त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांना एका प्रकरणात त्याचा शोध होता.

लग्नाचे आश्वासन देऊन आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

महाराष्ट्र पोलिसांकडे दाखल एफआयआरनुसार, आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन एका महिलेशी संबंध प्रस्थापित केले आणि तिचे शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक शोषण केले, असा आरोप आहे. संबंधित महिलेची 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

तपासात आरोपीने अशाच पद्धतीने आणखी 13 महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या महिलांकडून पैसे घेतल्याचा तसेच त्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. तपास सुरू असताना आरोपी परदेशात पळून गेला होता.

इंटरपोलच्या रेड नोटीसनंतर UAE मध्ये अटक

महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीनंतर सीबीआयच्या नवी दिल्लीतील इंटरपोल राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोने आरोपीविरोधात रेड नोटीस जारी केली होती. इंटरपोलच्या माध्यमातून त्याचे ठिकाण शोधण्यात आले. त्यानंतर UAE मधील अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.

आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर UAE प्रशासनाने त्याला भारतात परत पाठवण्यास परवानगी दिली. महाराष्ट्र पोलिसांचे पथक UAE मध्ये पोहोचले आणि आरोपीला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात घेऊन भारतात आणले. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांचे सुरक्षा पथक त्याला घेऊन कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले.

2019 पासून 300 हून अधिक आरोपी भारतात परत

सीबीआयच्या माहितीनुसार, इंटरपोलच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोच्या माध्यमातून परदेशात फरार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना भारतात आणण्याचे काम केले जाते. 2019 पासून आतापर्यंत 300 हून अधिक फरार आरोपींना भारतात परत आणण्यात आले आहे. त्यापैकी 2026 मध्ये 74 आरोपींना भारतात आणण्यात यश आले असल्याचे सीबीआयने सांगितले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >