Yogi Adityanath News : योगी आदित्यनाथ यांच्यावर दुःखाचा डोंगर; मातोश्री सावित्री देवी यांचे निधन, कंगना रणौतची भावूक पोस्ट
सावित्री देवी यांच्या निधनाच्या वृत्ताला पंचूर गावातील नागरिकांनी दुजोरा दिला आहे. यमकेश्वरचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) चतर सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज संध्याकाळपर्यंत उत्तराखंडमधील आपल्या गावी पोहोचण्याची शक्यता आहे.
November 20, 2026 04:35 PM
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे आज (शुक्रवार, २० नोव्हेंबर) सकाळी १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. अखेर उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या 'पंचूर' या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे आदित्यनाथ कुटुंबावर शोककळा पसरली असून, राजकीय आणि कला क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
कंगना रणौत यांनी वाहिली श्रद्धांजली
मातोश्रींच्या निधनाची बातमी कळताच कंगना रणौत यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून एक भावनिक संदेश शेअर करत योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. आई जाण्याचे दुःख व्यक्त करताना कंगनाने ही बातमी आपल्यासाठी 'सर्वात दुःखद' असल्याचे म्हटले आहे. आपल्या पोस्टमध्ये कंगनाने लिहिले की, "ही सर्वात दुःखद बातमी आहे. माझे भाऊ योगीजी यांच्या मातोश्रींचे वयाच्या ९१ व्या वर्षी उत्तराखंडमध्ये निधन झाले आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, ओम शांती."
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे शुक्रवारी उत्तराखंड राज्यातील पौरी गढवाल जिल्ह्यातील ...
मूळ गावी शनिवारी अंत्यसंस्कार होणार
सावित्री देवी यांच्या निधनाच्या वृत्ताला पंचूर गावातील नागरिकांनी दुजोरा दिला आहे. यमकेश्वरचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) चतर सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज संध्याकाळपर्यंत उत्तराखंडमधील आपल्या गावी पोहोचण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने प्रशासनाकडून गावाजवळ तात्पुरते हेलिपॅड तयार केले जात असून, सुरक्षेची आणि इतर आवश्यक तयारी जोरात सुरू आहे. उद्या, शनिवारी (२१ नोव्हेंबर) सावित्री देवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असून, या अंत्यविधीला स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहतील.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द
ज्या वेळी आईच्या निधनाची ही धक्कादायक बातमी आली, त्या वेळी योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात व्यस्त होते. नियोजित वेळापत्रकानुसार ते आज संध्याकाळी गोंडा येथे रामकथेच्या कार्यक्रमाला जाणार होते आणि त्यानंतर लखनौमध्ये भाजप महिला आघाडीच्या एका महत्त्वाच्या बैठकीत मार्गदर्शन करणार होते. परंतु, मातोश्रींच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांनी हे दोन्ही कार्यक्रम तात्काळ रद्द केले आणि गावी जाण्याची तयारी सुरू केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिषेक दावाच्या यांनी मुख्यमंत्र्यांचे हे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याच्या बातमीला अधिकृत दुजोरा दिला आहे.