सिन्नर : शेतात ऊसतोड सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दोन महिला मजुरांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे घडली आहे. या हल्ल्यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी नाशिकच्या बिटको सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच परिसरात नरभक्षक बिबट्याने दहशत निर्माण केली होती. त्यामुळे पुन्हा बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नेमकं काय घडलं ?
वडांगळी-तामसवाडी रस्त्यालगत शांताराम सैंद यांच्या मालकीच्या शेतात रविवारी (दि. २२) दुपारी २० ते २५ मजूर ऊसतोडणीचे काम करत होते. काही पुरुष ट्रॅक्टरमध्ये उसाच्या मोळ्या रचत होते, तर महिला शेतात ऊस तोडत होत्या. याचवेळी अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलांवर झडप घातली. अनपेक्षित हल्ल्यामुळे शेतातील मजुरांची एकच पळापळ झाली.
या हल्ल्यात सोन्याबाई ज्ञानेश्वर राठोड (२५) यांच्या गुडघा, कंबर आणि पाठीवर बिबट्याच्या नखांनी खोलवर जखमा केल्या आहेत. तर योगिता अर्जुन जाधव (३०) यांच्या डोक्याला आणि उजव्या दंडाला बिबट्याच्या पंजाचा मार लागला आहे. दोन्ही महिला चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील रहिवासी आहेत.
Nashik Crime : मुला-मुलींच्या छळाला कंटाळून सेवानिवृत्त RTO अधिकाऱ्याची आत्महत्या ? चौघांविरोधात गुन्हा
नाशिक : मुलांना लहानाचे मोठे केले, शिक्षण दिले; मात्र त्यांच्याकडूनच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ होत असल्याचा आरोप... त्यातच मालमत्तेच्या वादातून ...
वनविभागाकडून जखमी महिलांना तातडीने मदत
घटनेची माहिती मिळताच वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक दीपाली सदावर्ते, मधुकर शिंदे तसेच वन्यजीव रक्षक रोहित लोणारे आणि निखिल वैद्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलांना तातडीने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी बिटको सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या उपचारासाठी वनविभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
हल्ल्यानंतरही बिबट्याचा परिसरात वावर
दोन महिलांवर हल्ला केल्यानंतर बिबट्याने परिसर सोडलेला नसल्याचे समोर आले आहे. शेतातील मजुरांनी केलेल्या चित्रीकरणात हल्ल्यानंतरही बिबट्या परिसरात मुक्तपणे फिरताना दिसत आहे. त्यामुळे वडांगळी परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऊसतोडणीचा हंगाम सुरू असतानाच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याने शेतात काम करायचे तरी कसे, असा प्रश्न मजुरांसमोर उभा राहिला आहे. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.