शेतकरी कायद्यांमुळे २०२० मध्ये तुटले होते नाते
भाजप आणि अकाली दल यांची मैत्री अनेक दशकांची होती. मात्र, सप्टेंबर २०२० मध्ये केंद्र सरकारने आणलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आणि अकाली दलाने भाजपची साथ सोडली होती. पुढे देशभरातील शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकारने हे तिन्ही कायदे रद्द केले. कायदे मागे घेतल्यानंतर दोन्ही पक्षांतील दुरावा कमी होऊ लागला होता आणि नेतेही पुन्हा एकत्र येण्याचे संकेत देत होते. स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनीही पंजाबमध्ये पुढचे सरकार 'एनडीए'चेच (NDA) बनेल, असे वक्तव्य करून या युतीचे स्पष्ट संकेत दिले होते.
जुनी ताकद आणि स्वतंत्र लढण्याचा बसलेला फटका
दोन्ही पक्षांचा निवडणूक इतिहास पाहिल्यास, १९९८ ते २०१९ या काळात त्यांनी सलग सहा लोकसभा निवडणुका आणि १९९७ ते २०१७ दरम्यान पाच पंजाब विधानसभा निवडणुका एकत्र लढवून आपली ताकद दाखवून दिली होती. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढण्याचा निर्णय दोन्ही पक्षांना खूप महागात पडला. त्या निवडणुकीत अकाली दलाला आपल्या इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी करत फक्त ३ जागा जिंकता आल्या, तर भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. याउलट, २०१७ मध्ये युती असताना अकाली दलाने १५ आणि भाजपने ३ जागा जिंकल्या होत्या.
मागील पराभवांपासून धडा घेत घेतला मोठा निर्णय
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही या दोन्ही पक्षांची पुन्हा युती होईल अशी जोरदार चर्चा रंगली होती, पण तेव्हा जागावाटपाचे गणित जुळू शकले नाही. याचा मोठा फटका त्यांना लोकसभेतही बसला; जिथे अकाली दलाला फक्त १ जागा मिळाली आणि भाजपला राज्यात भोपळाही फोडता आला नाही. सलग होणाऱ्या या पराभवांपासून धडा घेत आणि मतांची विभागणी टाळण्यासाठी अखेर दोन्ही जुन्या मित्रपक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकत्र मैदानात उतरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.