कुर्ला मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मदरशांवर बंदीची मागणी
मुंबई : कुर्ला येथे एका तरुण-तरुणीला झालेल्या मारहाणीवरून राज्यभरातून संताप व्यक्त होत असताना, राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मदरशांमधील शिक्षणपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत हल्लाबोल केला. मदरशांमध्ये हिंदूविरोधी विचार शिकवले जात असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली. तसेच समान नागरी कायद्याला (यूसीसी) विरोध करणारे देशद्रोही असून, त्यांना पाकिस्तान, बांगलादेशात जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री राणे म्हणाले, “मदरशांमध्ये जे शिक्षण दिले जाते, त्यामुळेच हे लोक बाहेर जाऊन अशा प्रकारच्या हरकती करतात. कुराणमध्ये काय लिहिले आहे, हिंदूंचा द्वेष करायचा, हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना इस्लाम स्वीकारायला लावायचा आणि पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीने इस्लाम स्वीकारेपर्यंत शांत बसायचे नाही, असे त्यांना मदरशांमध्ये शिकवले जाते. आम्ही वारंवार सांगतो की, ही मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत. या मदरशांमधून शिकून डॉक्टर आणि इंजिनीअर तयार होत नाहीत आणि चुकून कोणी झालाच, तरी तो पुढे जाऊन दहशतवादी होतो. त्यामुळे मदरसे बंद करण्याचा विचार ज्या दिवशी होईल, त्या दिवसापासून घाटकोपर आणि कुर्ल्यासारख्या घटना थांबतील. त्या दाम्पत्याविषयी या मुलांच्या मनात जो राग होता, त्यामागे हिंदूंना संपवा आणि त्यांचा द्वेष करा, अशी शिकवण असल्याचे मला वाटते.”
Godavari Pollution: गोदावरी प्रदूषणप्रकरणी 199 अधिकारी न्यायालयाच्या रडारवर
मुंबई : गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात 199 अधिकाऱ्यांची नावे सादर केली आहेत. ...
नितेश राणे म्हणाले, “आपण ज्या देशात राहतो, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणारा देश आहे. तुम्ही, आम्ही आणि आपली मुले जे शिक्षण घेतो, ते एकाच पद्धतीचे आहे. मात्र, मदरशांमध्ये दिले जाणारे शिक्षण सामान्य शाळांमध्ये दिले जात नाही. मग एकाच देशात दोन-दोन कायदे का? आपण सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानत असू, तर शरिया कायदा मानणाऱ्यांना आपल्या देशात स्थान कशासाठी? देशात एकच कायदा असायला हवा. मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत, गुन्हेगारी आणि जिहाद वाढत आहे. मदरशांमध्येही आपल्या मुलांना दिले जाते तसेच शिक्षण देण्यास सुरुवात होत नाही, तोपर्यंत घाटकोपर आणि कुर्ल्यासारख्या घटना थांबणार नाहीत. मदरशांच्या माध्यमातून त्यांच्या डोक्यात द्वेषाचे विष पेरले जाते”, असेही त्यांनी सांगितले.
कुर्ला प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर केल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत विचारले असता राणे म्हणाले, “त्यांना अल्पवयीन किंवा लहान मुले कसे म्हणायचे? कोणाचा द्वेष करायचा, कोणावर दगड मारायचा, कोणाला लाथा मारायच्या, हे त्यांना माहीत आहे. म्हणूनच मी त्यांना ‘टिकिंग टाइम बॉम्ब’ म्हटले आहे. आज त्यांनी दगड उचलला आहे, उद्या बॉम्ब उचलतील. त्यांना हेच शिकवले जाते. त्यामुळे माझ्या मते त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्या दाम्पत्याचे निवेदन मी ऐकले आहे. त्यांना ‘आम्ही तुम्हाला मारून टाकू, गोळ्या घालून उडवून देऊ’, अशा धमक्याही देण्यात आल्या होत्या. हे सर्व समोर आले आहे, नोंदवले गेले आहे. आपल्या हिंदू राष्ट्रात पुन्हा अशी हिंमत कोणी करू नये, यासाठी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.”
Kurla Crime: कुर्ल्यातील महाजन उद्यानात तरुण तरुणीला अल्पवयीन टोळक्याकडून झालेल्या मारहाणीची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडून दखल
मुंबई: मुंबईतील कुर्ल्यातील महाजन उद्यानामध्ये एका जोडप्याला अल्पवयीन टोळक्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. संबंधित प्रकरण शुक्रवारी (20 ...
'युसीसी'ला विरोध करणारे देशद्रोही
समान नागरी कायद्याला काही समुदायांकडून होत असलेल्या विरोधाबाबत विचारले असता राणे म्हणाले, “भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ४४मध्ये देशातील नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्याने प्रयत्न करावेत, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे यूसीसीला विरोध करणारा प्रत्येक जण देशद्रोही आहे. यूसीसीला विरोध करणारा शरिया कायद्याचा आणि जिहादचा समर्थक आहे. त्यांना या देशात शरिया कायदा आणायचा आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानायचे नाही. ज्यांना आपले संविधान मान्य नाही, त्यांची या देशात काय गरज आहे? यूसीसी मान्य नसेल, तर पाकिस्तान, बांगलादेश आणि शरिया कायदा मानणाऱ्या देशांत तुम्ही जाऊ शकता. संविधानाला विरोध करून आपल्याला या देशात राहायचे आहे, अशी भूमिका घेणाऱ्यांना येथे राहण्याची गरज नाही, अशीच प्रत्येक भारतीय नागरिकाची भूमिका असली पाहिजे.”
“आपल्या राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातच आम्ही सरकार आल्यावर धर्मांतरविरोधी कायदा आणू, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ आम्ही आणला आहे. दुसरे म्हणजे, यूसीसी लागू करण्याची प्रक्रियाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे. त्यासाठी समिती स्थापन झाली असून सर्वत्र सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. डिसेंबरच्या अधिवेशनात अहवाल सभागृहात मांडला जाईल, असे मला वाटते. याबाबत मुख्यमंत्री कार्यालय अधिक स्पष्ट भूमिका मांडू शकेल. मात्र, हे सर्व निर्णय आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून घेत आहोत. यात असंवैधानिक काहीही नाही. ज्यांना देशाचे संविधान समजते आणि ते मान्य आहे, त्यांना यूसीसीबाबत आक्षेप असण्याचे कारण नाही. त्यामुळे राज्यात यूसीसी लागू होईल, त्यात अडचण येणार नाही. ज्यांना याचा त्रास आहे, त्यांनी पाकिस्तान, इस्लामाबाद किंवा कराचीचे तिकीट काढून निघून जावे”, असा हल्लाबोल मंत्री नितेश राणे यांनी केला.