विमानतळ, बंदर विस्तार आणि टपाल सेवांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा मंजूर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री उत्पादन आणि टपाल यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पाच महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांसाठी केंद्र सरकार एकूण १९,९३४ कोटी रुपये खर्च करणार आहे. या निर्णयांमध्ये आसाममधील सिलचर येथे नवीन ग्रीनफील्ड विमानतळ उभारणे, तामिळनाडूतील कामराजार बंदराचा विस्तार करून तेथे दुसरे कंटेनर टर्मिनल बांधणे आणि बांधकाम क्षेत्रातील उपकरणांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी ११,००० कोटी रुपयांची विशेष योजना राबवणे यांचा समावेश आहे.
बांधकाम उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनासाठी ११,००० कोटींची योजना
Chiplun Crime News : चिपळूण हादरले! गोवळकोट रोड परिसरात भरदिवसा कोयत्याने हल्ला; दोन गटांतील वादातून तरुण गंभीर जखमी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात भरदिवसा कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील गजबजलेल्या गोवळकोट रोड ...
देशात बांधकाम आणि पायाभूत प्रकल्पांसाठी लागणाऱ्या मोठ्या यंत्रसामग्रीचे (CIE) उत्पादन वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाने ११,००० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. २०२६-२७ ते २०३३-३४ या आठ वर्षांत ही योजना राबवली जाईल. माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारत या क्षेत्रात जगातील तिसरी मोठी बाजारपेठ असून २०२४-२५ मध्ये तिची उलाढाल सुमारे ९७,००० कोटी रुपये होती. सध्या या क्षेत्रातील ४५ टक्के उपकरणे परदेशातून आयात करावी लागतात. ही आयात थांबवून देशातच आधुनिक यंत्रे तयार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेतून बोगदा खोदणारी यंत्रे (टनेल बोरिंग मशीन), ऑफ-हायवे ट्रक, एक्स्कॅव्हेटर, क्रेन, लोडर, पायलिंग रिग आणि ड्रिलिंग मशीन या सात प्रमुख उपकरणांच्या निर्मितीला चालना दिली जाईल. रस्ते, पूल आणि बोगद्यांच्या कामात या यंत्रांचा मोठा वापर होतो.
कामराजार बंदरावर उभारले जाणार दुसरे कंटेनर टर्मिनल
तामिळनाडूतील कामराजार पोर्ट लिमिटेड (KPL) येथे दुसरे कंटेनर टर्मिनल विकसित करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे. सुमारे ४,२८८ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारला जाईल. १११ एकर क्षेत्रावर साकारल्या जाणाऱ्या या टर्मिनलची वार्षिक क्षमता २० लाख कंटेनर्स (TEUs) हाताळण्याची असेल. येथील जहाजे उभी राहण्याची जागा ९०० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद असणार आहे, ज्यामुळे ४०० मीटरपर्यंत लांब आणि २४,३४६ कंटेनर्स वाहून नेणारी मोठी जहाजे येथे सहज येऊ शकतील. ४० वर्षांच्या कराराच्या या प्रकल्पामुळे बंदराची कार्यक्षमता वाढून सागरी व्यापाराला मोठी गती मिळणार आहे.
आसाममधील सिलचर येथे नवीन ग्रीनफील्ड विमानतळाची उभारणी
आसाममधील सिलचर येथील डोलू भागात नवीन ग्रीनफील्ड विमानतळ बांधण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. २,०१४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) स्वतःच्या निधीतून करणार आहे. या नवीन विमानतळावर गर्दीच्या वेळी एका तासात ८०० प्रवाशांची (४०० येणारे आणि ४०० जाणारे) वाहतूक हाताळता येईल, तर वार्षिक प्रवासी क्षमता १०.१ लाख असेल. सध्याचे सिलचर विमानतळ भारतीय वायुसेनेच्या ताब्यात असल्याने आणि तेथे जागा अपुरी असल्याने विस्तार शक्य नव्हता. नवीन विमानतळामुळे बराक व्हॅली आणि ईशान्य भारतातील हवाई वाहतूक सुधारून पर्यटन आणि स्थानिक व्यवसायाला चालना मिळेल.
ग्रामीण डाकघरांच्या आधुनिकीकरणासाठी १,१४१ कोटींची तरतूद
पुढील पाच वर्षांत देशातील टपाल कार्यालये अधिक आधुनिक करण्यासाठी सरकारने १,१४१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून ग्रामीण भागातील डाकघरे अद्ययावत करणे, पत्रे आणि पार्सल पोहोचवणारी वाहतूक व्यवस्था (लॉजिस्टिक्स) मजबूत करणे आणि सरकारी योजनांचा लाभ थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे यावर भर दिला जाईल. यामुळे दुर्गम भागातील लोकांनाही वेगवान आणि आधुनिक टपाल सेवा मिळणे सोपे होणार आहे.
टपाल विभागाच्या इमारती आणि कर्मचारी निवासस्थानांचे नूतनीकरण
टपाल विभागाची 'इस्टेट मॅनेजमेंट स्कीम' पुढे सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांत यावर १,४९१ कोटी रुपये खर्च केले जातील. या अंतर्गत नवीन डाकघरे बांधणे, जुन्या कार्यालयांची दुरुस्ती करणे आणि देशभरातील सर्व डाकघरांना एकसारखा लूक (ब्रँडिंग) देणे अशी कामे केली जातील. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची डागडुजी आणि विभागाच्या ऐतिहासिक इमारतींचे जतनही केले जाईल. पार्सल बुकिंग, शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवणे आणि आर्थिक समावेशनासाठी ही आधुनिक डाकघरे अत्यंत उपयुक्त ठरतील, असा सरकारचा विश्वास आहे.
पाच निर्णयांतून विकासाला मोठी चालना
केंद्र सरकारच्या या १९,९३४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत सर्वाधिक निधी देशांतर्गत बांधकाम उपकरण निर्मितीसाठी ठेवण्यात आला आहे. विमानतळ, बंदर विस्तार आणि टपाल सेवांच्या सक्षमीकरणातून देशाची वाहतूक व्यवस्था, व्यापार आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक भक्कम करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे.