अस्वस्थ बांगलादेश धोक्याचा…

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांनी बांगलादेशात परतण्याची १६ डिसेंबर ही तारीख जाहीर करून जगभर खळबळ उडवून दिली आहे. त्यासाठी त्यांनी विशेष विमानाचीही मागणी केली आहे. त्यामुळे बांगलादेशात तीव्र राजकीय अस्थिरता आणि हिंसाचार उसळला आहे. त्यावर पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारने त्यांना 'फरार गुन्हेगार' ठरवून केवळ प्रत्यार्पण करारांतर्गत हातकड्या घालूनच परत आणले जाईल, असा इशारा दिला आहे.

शेख हसीना यांच्या पुनरागमनाच्या घोषणेनंतर आणि त्यांच्या 'अवामी लीग' या बंदी घातलेल्या पक्षावरील कारवाईविरोधात देशभरात तणाव वाढला. शेख हसीना यांचे जन्मगाव असलेल्या गोपालगंज जिल्ह्यासह देशभरातील अनेक भागांत अवामी लीगच्या समर्थकांनी रस्ते अडवून हिंसक निदर्शनं केली आहेत. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ, कच्च्या बॉम्बचे स्फोट, पोलिस चौक्यांची तोडफोड आणि सत्ताधारी 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'च्या (बीएनपी) कार्यालयांवर हल्ले झाले आहेत.

या हिंसाचारात काही जणांचा मृत्यू झाला असून, माजी अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेच्या अनेक शाखांवरही जाळपोळीचे हल्ले झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तारिक रहमान सरकारने संवेदनशील जिल्ह्यांमध्ये 'बॉर्डर गार्ड बांगलादेश'च्या तुकड्या तैनात केल्या आहेत. आतापर्यंत शेकडो आंदोलक व अवामी लीगच्या नेत्यांना अटक केली आहे. तसेच, हसीना यांचा नवीन पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्राचा अर्ज सरकारने फेटाळून लावला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर जेन झीच्या आंदोलनावर स्वार होऊन बांगलादेशात दोन वर्षांपूर्वी सत्तांतर झालं. त्यानंतर शेख हसिना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे (बीएनपी) नेते तारिक रहमान पंतप्रधान बनले. दरम्यान बांगलादेशात हसिना यांच्यावर खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षाही ठोठावण्यात आली. त्यानंतर बांगलादेशचं सरकार हसिना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांपैकी किमान २८ जिल्ह्यांमध्ये हिसाचाराचं लोण पसरलं आहे. तेथे जानेवारी ते सप्टेंबर २०२६ दरम्यान राजकीय हिंसाचाराच्या १,०१३ घटनांमध्ये किमान ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त झुंडबळीच्या (मॉब लिंचिंग) घटनांमध्ये १८७ जण ठार झाले, असे अहवाल आहेत. बांगलादेशचे परराष्ट्र राज्यमंत्री हुमायूं कबीर आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचे मुख्य अभियोक्ता मोहम्मद अमिनुल इस्लाम यांनी स्पष्ट केले आहे की, २०२४ च्या विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईप्रकरणी हसीना यांना त्यांच्या अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या देशात परतल्यास त्यांना विमानतळावरच तात्काळ अटक करून तुरुंगात टाकले जाईल आणि शिक्षेची अंमलबजावणी केली जाईल. बांगलादेशी अभियोक्त्यांच्या मते हसीना यांनी शिक्षेविरुद्ध अपील करण्याची कायदेशीर मुदत गमावली आहे, त्यामुळे फाशी रोखण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार उरलेला नाही.

दुसरीकडे, हसीना यांनी हा खटला बेकायदेशीर ठरवत न्यायालयात लढा देण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यामुळे मोठा कायदेशीर संघर्ष उभा राहू शकतो. १६ डिसेंबर या राष्ट्रीय सणाच्या दिवशी हसीना परतल्यास अवामी लीगचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून सरकारशी थेट संघर्ष करण्याची शक्यता आहे. यामुळे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या सरकारसमोर देशभरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. बांगलादेश सरकारने भारताकडे हसीना यांच्या प्रत्यार्पणाची औपचारिक मागणी केली आहे. हसीना स्वतःहून परत जाणार, की भारत सरकार कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्यांचा ताबा देणार, या वरून नवी दिल्ली आणि ढाका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांची मोठी कसोटी लागणार आहे.दरम्यान, बांगलादेशाचा मुख्य कणा असलेला तयार कपडे उद्योग (रेडिमेड गारमेंट) सध्या संकटात सापडला आहे. तयार कपड्यांचा उद्योग हा बांगलादेशाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. या क्षेत्रात सुमारे ४० लाख कामगार कार्यरत आहेत आणि देशाच्या निर्यात उत्पन्नातील ८० टक्क्यांहून अधिक वाटा या उद्योगाचा आहे. तेथे किमान वेतन १२,५०० टकावरून ३०,०००-३२,००० टका करण्याची कामगारांची मागणी आहे. बांगलादेशच्या तयार कपडे उद्योगात एकूण सुमारे ४० लाख कामगार काम करतात. त्यापैकी नऊ लाख ८७ हजारांहून अधिक लोक रस्त्यावर उतरले आहेत. इतकी वेतनवाढ देणं शक्य नसल्याचं कारखानदारांचं म्हणणं आहे. बांगलादेशातील अस्थिरतेचे भारतावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होत आहेत. बांगलादेशातील कारखाने बंद पडल्यामुळे जागतिक ब्रँड्सच्या ऑर्डर भारताकडे वळत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, भारताची कापड निर्यात सुमारे १६.१ टक्क्यांनी वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतानं बांगलादेशला १०.९६ अब्ज डॉलरची निर्यात केली, तर बांगलादेशातून १.७५ अब्ज डॉलरची आयात केली. बांगलादेशातील कारखाने बंद राहिल्यास भारताकडून तिकडे जाणाऱ्या कापूस आणि सुताच्या निर्यातीवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.

मुळात बंगलादेश सारखा शेजारी अस्वस्थ असणं भारताच्या निश्चितच फायद्याचा नाही. भारताशी संबंध ताणले गेल्याचा फायदा घेत बांगलादेश सरकारने चीनसोबत पायाभूत सुविधा व संरक्षण क्षेत्रात, तर पाकिस्तानसोबत राजनैतिक व आर्थिक क्षेत्रात जवळीक वाढवली आहे. बांगलादेशातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्यास तेथील भारतविरोधी दहशतवादी गट पुन्हा सक्रिय होऊ शकतात, ज्याचा थेट धोका भारताच्या ईशान्येकडील राज्यांना आहे. सध्या सीमेवर तणाव वाढला असून, घुसखोरीचे प्रकार वाढण्याची भीती आहे. तसेच, बांगलादेशातील हिंदू व इतर अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न भारतासाठी चिंतेचा विषय आहे. बांगलादेशातील अस्थिरतेमुळे भारताच्या ईशान्य राज्यांना जोडणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्ग प्रकल्पांना विलंब होत असून, द्विपक्षीय व्यापाराचं नुकसान होत आहे. भारतानं या सर्वांचा विचार करूनच पुढील धोरणं आखणं आवश्यक आहे.
Comments
Add Comment

उद्याने कुणाच्या ताब्यात?

कुर्ला येथील प्रमोद महाजन उद्यानात छायाचित्रे काढणाऱ्या तरुण-तरुणीभोवती मुलांचा गराडा पडला आणि काही क्षणांत

उद्योगजगताला कानपिचक्या

सरकारने करसवलती, व्यापार करार आणि उद्योगपूरक धोरणांतून उद्योगजगतासाठी संधींची दारे खुली केली आहेत. आता

ग्राहक नव्हे, निर्माते व्हा!

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी कल्पकतेला पर्याय नसतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मानवी सर्जनशीलतेचे

विवेकदीप उजळी...

बाहेर सर्वत्र दिव्यांची रोषणाई आहे, काहींनी पारंपारिक आकाश कंदील आणि पणत्या प्रकाशमान केल्या आहेत, ग्राहकाच्या

डिजिटल आर्थिक क्रांतीतील नवे पर्व

अलीकडेच भारताने डिजिटल क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये एक एतिहासिक पाऊल टाकले. आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी

मराठवाड्यात पिकांना नवसंजीवनी

मराठवाड्यात समाधानकारक सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा