Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची दुसरी मराठी निर्मिती असलेल्या ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. या प्रीमियरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 450 हून अधिक प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सभागृहात चित्रपटाचे प्रदर्शन झाले. भावूक क्षण, प्रेक्षकांची दाद आणि टाळ्यांचा कडकडाट अशा वातावरणात हा विशेष सोहळा रंगला.
या प्रदर्शनाला चित्रपटातील प्रमुख कलाकार सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके यांच्यासह लेखक-दिग्दर्शक दिपक गावडे आणि निर्माते अंकुर गर्ग उपस्थित होते. या चित्रपटातील कथा पुढे जात असताना त्यातील भावविश्व आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला. सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमधील सहजता, संवेदनशीलता आणि बारकावे यांचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या अभिनयाला सभागृहातून उत्स्फूर्त दाद मिळाली.
Dhadkan Sequel: 26 वर्षांनंतर 'धडकन 2' येणार? अक्षय-शिल्पाच्या जागी दिसणार नवी जोडी!
Dhadkan 2 : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल आणि रिमेक बनवण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. 90 च्या दशकातले काही हिट चित्रपटांचे सीक्वेल ...
अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर काय म्हणाल्या?
इफ्फीसाठी आपल्या चित्रपटाची निवड होणं हे आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे, असं मला वाटतं. या चित्रपटाकडे मला आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे माझा एक अत्यंत वैयक्तिक अनुभव, आणि हाच चित्रपट स्वीकारण्यामागचं माझं एक प्रमुख कारण ठरलं. याशिवाय, लव रंजन आणि अंकुर गर्ग या हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन मुख्य प्रवाहातील निर्मात्यांनी मराठीतील इतक्या संवेदनशील कथेची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला, ही गोष्टही माझ्यासाठी प्रोत्साहन देणारी होती. दीपक यांनी केलेलं कथाकथन, पटकथेतील ताकद आणि या कथेवर त्यांनी दाखवलेला विश्वास, या सगळ्यामुळेच मी या चित्रपटाशी जोडले जाण्याचा निर्णय घेतला, असे आपल्या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले.
सिद्धार्थ बोडके काय म्हणाला?
स्वतःची एक ओळख निर्माण करण्याच्या धडपडीत आपण नेमके कसे माणूस बनत जातो, हा एक महत्त्वाचा प्रश्न हा चित्रपट उपस्थित करतो. हा प्रवास खूप सुंदर राहिला आहे आणि Tu Aahes Na चा प्रीमियर इफ्फीमध्ये झाला, याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान आहे. विशेषतः, इथे येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. या संधीसाठी मी लव सर, अंकुर आणि दीपक यांचा मनापासून आभारी आहे. सुप्रिया ताईंसोबत काम करणं आणि त्यांच्यासोबत अनेक भावभावना अनुभवणं हा माझ्यासाठी एक खास अनुभव होता. लहानपणापासूनच मी त्यांच्या कामाचा चाहता असल्यामुळे हा अनुभव आणखी विशेष ठरला.
या खास सोहळ्याला सिद्धार्थचे कुटुंबीयही उपस्थित होते. चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्रत्यक्ष पाहाण्याचा त्यांचा हा क्षण कुटुंबासाठीही अविस्मरणीय ठरला. संपूर्ण भरलेले सभागृह, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव आणि चित्रपट संपल्यानंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट यामुळे ‘तू आहेस ना’च्या संपूर्ण टीमसाठी इफ्फीतील हा वर्ल्ड प्रीमियर विशेष ठरला. लव फिल्म्स प्रस्तुत ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिपक गावडे यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 2027 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.