मुंबई (विशेष प्रतिनिधी)
BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा निर्मितीचा महत्वाचा टप्पा गाठला आहे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र २०४७ च्या दिशेने मुंबईकरांच्या आरोग्याचा संकल्प केंद्रस्थानी असणारे धोरणाबाबतच्या मसुद्याचे सादरीकरण नुकतेच सार्वजनिक आरोग्य समितीसमोर करण्यात आले. आरोग्य निदानासाठी डिजिटल सेवांच्या वापरासोबतच संस्थात्मक बळकटीकरण, राष्ट्रीय आरोग्य योजनांचा नागरी सेवांसाठी प्रभावीपणे वापर करणे यासारख्या विविध बाबींचा धोरणामध्ये समावेश करण्यात आला आहे. (BMC Health Policy)
सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या विविध आरोग्य योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होण्याच्या अनुषंगाने या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य योजनांना फायदा होण्यातच आरोग्य धोरणाचे यश आहे असेही ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर करून रूग्ण निदान तसेच विविध आरोग्य सेवांमध्ये अधिक उपयुक्तरित्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी भर देण्यात यावा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिल्या आहेत. योजनाच्या यशासाठी कालबद्धपणे ठेवण्यात आलेली उद्दिष्टपूर्तीसाठी महानगरपालिकेच्या प्रमुख रूग्णालये, उपनगरीय रूग्णालये यासोबतच विविध आरोग्य संस्थांचा वाटा महत्वाचा असणार आहे, असेही प्राजक्ता लवंगारे म्हणाल्या.
Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडण्यासाठी नवी मुंबईत 7.35 किलोमीटर ...
नागरी आरोग्य धोरणाच्या मसुदा सादरीकरणावेळी सार्वजनिक समितीचे सदस्य, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख महाविद्यालय) डॉ. शैलेश मोहिते, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत पवार, प्रमुख महाविद्यालयांचे अधिष्ठाता, तसेच अधिकारी आदी उपस्थित होते.
नागरी आरोग्य धोरणाच्या मसुद्याची विभागणी प्रामुख्याने चार टप्प्यात करण्यात आलेली आहे.पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेचा दृष्टिक्षेपाच्या मांडणीतून आढावा घेण्यात आलेला आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत महानगरपालिकेच्या कामगिरी आणि भविष्यातील सेवांच्या अनुषंगाने क्षमतावाढीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.तिसऱ्या टप्प्याअंतर्गत मूलभूत तत्वे, प्राधान्य क्षेत्र आणि प्रशासकीय पाठबळाची गरज नमूद करण्यात आली आहे. तर शेवटच्या टप्प्याअंतर्गत प्रथम १०० दिवसांचा संकल्प आणि महत्वाच्या निष्कर्षांची नोंद करण्यात आली आहे.
नागरी आरोग्य धोरणअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील प्राधान्य क्षेत्रांच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय आरोग्य सेवां सक्षमीकरणासोबतच उत्कृष्टता केंद्रांच्या उभारणीलाही महत्व देण्यात आले आहे. प्रमुख रूग्णालयांवर असणारा ताण पाहता उपनगरांमध्ये अतिविशेष संस्थांची निर्मिती आणि लहान मुलांसाठी एनआयसीयू यासारख्या सेवांच्या बळकटीकरणासाठी भर देण्यात आला आहे. रूग्णांच्या सुविधेसाठी डे केअर, निदान आणि उपात्मक सेवा केंद्रांच्या निर्मिती प्राधान्यस्थानी असणार आहे.
विविध वयोगटाअंतर्गत महिला आरोग्य केंद्रे, जेष्ठ नागरिक आणि युवा पिढीसाठीच्या आरोग्याच्या अनुषंगाने धोरणाअंतर्गत क्षमतावाढीला महत्व देण्यात आले आहे.असंसर्गजन्य आजार व कर्करोग सेवांच्या विकेंद्रीकरणासाठी भर देण्यात आला आहे. संसर्गजन्य आजार प्रतिबंध आराखडा धोरणाअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. मुंबई मानसिक आरोग्य अभियानाच्या अनुषंगाने सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.
प्रत्येक मुंबईकरासाठी डिजिटल आरोग्य व्यवस्था समोर ठेवून सर्व महानगरपालिका दवाखाने, आपला दवाखाने, प्रसूतिगृहे आणि प्रत्येक महानगरपालिका संस्थेत हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आरोग्य सेवेत येत्या कालावधीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वर कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासोबतच आरोग्य नियंत्रण आणि संदर्भ केंद्रांना डिजिटल तंत्रज्ञानाची भर देण्यात येणार आहे. वर्ष २०३५ दृष्टीक्षेपात ठेवून प्रत्येक मुंबईकर नागरिकांना 'आभा' हेल्थ कार्ड देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच प्रत्येक विभागाचा डॅशबोर्ड तयार करण्यात येईल. क्षयरोग, कर्करोग आणि साथींच्या आजारांसाठी एआय वर आधारित तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येईल. वर्ष २०४७ चे उद्दिष्ट समोर ठेवून टेली आयसीयू, एआय निदान आणि सार्वजनिक व खासगी सेवांमध्ये एकच आजीवन नोंद ठेवणारी यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. त्यासोबतच आरोग्य आराखड्याला मार्गदर्शन करणारे नागरी आरोग्य डेटा सेंटर विकसित करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे.
त्यासोबतच संशोधन, एआयचा वापर , प्रत्येक महाविद्यालयाला NIRF व गुणवत्ता कक्ष, अध्यापन रूग्णालयांना २ टप्प्यात NABH, प्रयोगशाळांना NABL नामांकन, ४ महाविद्यालयांना कौशल्य प्रयोगशाळा, शहरस्तरीय प्रगत सिम्युलेशन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. महानगरपालिका रूग्णालयात एआय, मेडटेक आणि डिजिटल केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे.
पहिल्या १०० दिवसांसाठीचे उद्दिष्ट
उपनगरीय रूग्णालयांमध्ये भागिदारी तत्वावर सीटी आणि एमआरआय स्कॅनिंगची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासोबतच के.बी. भाभा रूग्णालय आणि एम.टी. अगरवाल रूग्णालय येथे कॅथलॅबची उभारणी करण्यात येणार आहे. सर्व उपनगरीय रूग्णालयात २४ तास सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. त्यासोबतच आणखी ८ ठिकाणी डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येतील. रक्तपेढ्यांना एन.ए.बी.एच मानांकन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. चिकित्सेसाठी एआय़चा वापर करून विश्लेषणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासोबतच प्रसूतीगृहाचे रूपांतर सर्वसमावेश महिला आरोग्य केंद्रात तयार करण्यासाठीचे उद्दिष्ट महानगरपालिकेने ठेवले आहे.